याचिकेत सुधारणा करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांना मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणात आरोपी असलेले रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना याचिकेत सुधारणा करण्यासाठी उच्च न्यायालयाने आणखी मुदतवाढ दिली आहे. तसेच त्यांना त्यांच्याविरोधात दाखल केलेले दोषारोपपत्रही सादर करण्याचे निर्देश दिले.
अर्णब गोस्वामी व अन्य दोन आरोपी फिरोज शेख आणि नितीश सारडा यांना गुरुवारी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. १६ डिसेंबर २०२० रोजी दंडाधिकारी यांनी अलिबाग पोलिसांनी नाईक आत्महत्येप्रकरणी दाखल केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेतली. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांना ७ जानेवारी रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. आरोपींवर लावलेल्या आरोपांतर्गत सात वर्षांहून अधिक शिक्षेची तरतूद असल्याने हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग करायचे असल्याने दंडाधिकारी यांनी तिन्ही आरोपींना हजर राहण्यास सांगितले.
अलिबाग पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांनी नोव्हेंबर महिन्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर अर्णब गोस्वामी व अन्य दोघांवर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर गोस्वामी यांनी दोषारोपपत्राला आव्हान देण्यासाठी याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी मागितली. डिसेंबरमध्ये न्यायालयाने त्यांना परवानगी दिली. बुधवारच्या सुनावणीत अर्णब गोस्वामी यांचे वकील निरंजन मुंदर्गी यांनी दोषारोपपत्र खूप मोठे असल्याने ते मराठीतून इंग्रजीत अनुवादित करण्यासाठी वेळ लागेल. त्यासाठी आम्हाला अधिक वेळ द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करीत या याचिकेवर ११ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली.