अर्नब गोस्वामींची १२ तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:02 AM2020-04-28T05:02:56+5:302020-04-28T05:03:02+5:30
गोस्वामी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या व अटक केलेल्या दोघांना सोमवारी जामीन मिळाला.
मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत वृत्तावरून खासगी वृत्तवाहिनीचे संपादक अर्नब गोस्वामी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी जवळपास १२ तास चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवित तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे गोस्वामी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या व अटक केलेल्या दोघांना सोमवारी जामीन मिळाला.
पालघर हत्याकांडासंदर्भातील चर्चेच्या कार्यक्रमात गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्याची तक्रार काँग्रेसच्यावतीने देशभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आली. याप्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार हा गुन्हा पुढील तपासासाठी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार गोस्वामी यांनी चौकशीसाठी हजर राहावे म्हणून पोलिसांकडून रविवारी दोन नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्याच नोटीशीला प्रतिसाद देत गोस्वामी यांनी सोमवारी सकाळीच पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार सकाळपासून सुमारे १२ तास त्यांच्याकडे चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.
दरम्यान, गोस्वामी यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी प्रतिककुमार शामसुंदर मिश्रा आणि अरुण बोराडे यांना अटक करण्यात आली होती.