मुंबई : पालघर झुंडबळीच्या घटनेवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणे आणि वैयक्तिक पातळीवर टिकाटिप्पणी तसेच सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी केल्याने त्यांच्यावर व त्यांच्या टीव्ही चॅनलवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी उच्च न्यायालयात शुक्रवारी दाखल केली.२१ एप्रिल रोजी रिपब्लिकन टीव्हीवर प्रसारित झालेल्या ‘ पुछता है भारत’ या कार्यक्रमात अँकर अर्णब गोस्वामी यांनी पालघर झुंडबळी प्रकरणाला धार्मिक व राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाबाबत भाई जगताप, सुरज ठाकूर यांनी चिंता व्यक्त केली.‘दोन धर्मात तेढ निर्माण केल्याबद्दल अर्णब गोस्वामी व रिपब्लिकन टीव्ही यांच्यावर गुन्हा नोंदवावा. पालघरचे प्रकरण जातीय नाही, असे सरकारने सांगूनही या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न गोस्वामी व त्यांच्या चॅनेलने केला,’ असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर अनेकवेळा टीका केली. संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना गोस्वामी यांनी शाब्दिक हल्ले करून समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असेही याचिकेत म्हटले आहे.
अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा; उच्च न्यायालयात जनहित याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 5:52 AM