मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते सध्या आमने-सामने आले आहेत. अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजपाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आणि अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर, देशमुख यांनीही अर्णब यांची काळजी करु नये, असे पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. तसेच, अर्णब गोस्वामींच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशीही सूचना भगतसिंह कोश्यारी यांनी अनिल देशमुख यांना केली आहे. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती.
राज्यपाल महोदयांचा मला फोन आला होता, त्यांनी अर्णब यांच्या कुटुंबीयांना भेटू देण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच, अर्णब यांच्या सुरक्षेसंबंधी चिंताही व्यक्त केली. मात्र, अर्णब यांच्या सुरक्षेसंदर्भात काळजी नसावी, असे मी राज्यपालांना आश्वस्त केल्याचं अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, अर्णब यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासंदर्भात कोरोनामुळे ते शक्य नसल्याचंही देशमुख म्हणाले. आरोपी किंवा कैद्यांच्या कुटुंबीयांना भेट देण्याची पद्धत आहे, त्यासाठी तेथील जेलर प्रशासन निर्णय घेत असतो. मात्र, गेल्या 6 महिन्यांपासून कोरोनामुळे कुणालाही कैद्यांना भेट देण्यात येत नाही. त्यामुळे, अर्णब यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भेट देणे शक्य नसल्याचंही देशमुख यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मुंबईतील राहत्या घरातून अटक केली होती. तिथून त्यांना रायगडमध्ये नेण्यात आले होते. तिथे न्यायालयात हजर केले असतान त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान, माझ्या जीवाला धोका आहे. अटकेत असताना मला मारहाण करण्यात आली. मला माझ्या वकिलांसोबत बोलू दिले जात नाही आहे, असा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला होता.
अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी
अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची रविवारी अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली. अर्णब यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून सत्र न्यायालयाचा पर्याय अर्णब यांना उरला आहे.