अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, शिवसेनेने विधानसभेत मांडला हक्कभंगाचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 11:37 AM2020-09-08T11:37:32+5:302020-09-08T12:15:04+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांवर टीका करणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्वब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
मुंबई - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील सरकारविरोधात आक्रमक झालेल्या आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांवर टीका करणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. राज्य सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या अर्णव गोस्वामींविरुद्ध शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव पारित झाल्यास अर्णबवर सभागृहाकडून कारवाई होऊ शकते.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीने सातत्याने वृत्तांकन केले आहे. मात्र यादरम्यान, अर्णव गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात सातत्याने टीका केली. तसेच अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान देण्याची भाषा केली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरुन पत्रकार अर्णब गोस्वामी वारंवार शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारला टार्गेट करत आहेत. यावरुन शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अर्णब गोस्वामीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली होती. या प्रकरणी त्यांनी गृहमंत्र्यांना निवेदन दिले होते. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर अत्यंत घृणास्पदरित्या बेछूट आरोप ही वाहिनी करत आहे. पोलीस खात्याचाही वेळोवेळी अपमान केलेला आहे. पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवला आहे असं अरविंद सावंत यांनी म्हटले होते.
अर्णब गोस्वामी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी भाषेत करुन धमकावले आहे. हे करतानाची त्यांची देहबोली अतिशय आक्षेपार्ह आणि संतापजनक होती. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी आणि त्याच्या वृत्तवाहिनीवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्रातील जनता करत आहे. या प्रकरणी गृहखात्याने लक्ष घालून तातडीने त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली होती.
तर महत्त्वाच्या बातम्या