वसई : वसई-विरार उपप्रदेशात अर्नाळा, वसई व नालासोपारा ही तीनही आगारे तोट्यात असून एकामागोमाग एक सेवा बंद करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे.आयुष्यमान संपलेली वाहने, साहित्याचा अभाव, साफसफाईकडे दुर्लक्ष, कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा व आगारातील दुर्दशेकडे झालेले दुर्लक्ष अशा नानाविध कारणांमुळे एसटीचा प्रवासी रिक्षाकडे वळला व कालांतराने आलेल्या महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला प्राधान्य दिले. अनेक आगारांत असलेल्या गैरसोयीमुळे रात्री महिला प्रवासी आगारात जाणे टाळतात. वसई रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आगारामध्ये रात्रीच्या वेळी होत असलेले अनैतिक व्यवसाय तसेच आगारातील झालेली दुर्दशा व आगारातील खड्ड्यांचे साम्राज्य अशामुळे प्रवासी एसटी सेवेपासून दूर गेला. गाड्या उशिराने सोडणे, प्रवाशांशी उर्मटपणे वागणे हीदेखील दोन महत्त्वाची कारणे एसटी सेवेच्या पीछेहाटीला कारणीभूत ठरली. होर्डिंग्ज, जाहिराती व आगारांतील दुकाने यांच्या माध्यमातून महसूल बऱ्यापैकी मिळत असला तरी त्याचा विनियोग आगारातील विकासकामांसाठी होत नाही. आमदारनिधीतुनविकासकामे करावीत, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.वसई-विरार शहर महानगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी स्वत:ची परिवहन सेवा सुरू केल्यानंतर एसटी महामंडळाच्या सेवा हळूहळू बंद पडत आहेत. एसटी महामंडळाच्या वसई-विरार परिसरातील अनागोंदी कारभारामुळे २००१ पासून या सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. अनेक सेवा तोट्यात गेल्यामुळे महामंडळाने त्या बंद करण्याचा निर्णय घेतला व त्या वेळी असलेल्या नगर परिषदांनी स्वत:च्या परिवहन सेवा सुरू करण्यासंदर्भात कळवले होते. परंतु, या सेवा परवडणार नाहीत म्हणून नगर परिषदांनी त्या सुरू केल्या नाहीत. मात्र, ५ वर्षांपूर्वी महानगरपालिका आल्यानंतर प्रशासनाने परिवहन सेवा सुरू केली. परिवहन सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे एसटी महामंडळाची सेवा मात्र हळूहळू बंद पडत चालली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे चांगल्या सेवेचा बोजवारा उडाला.(प्रतिनिधी)
अर्नाळा,वसई,सोपारा आगारे तोट्यात
By admin | Published: November 17, 2014 11:48 PM