वसई : अर्नाळाग्रामपंचायतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘जागर स्वच्छतेचा’ हा अभिनव कार्यक्रम राबवला आहे. या कार्यक्रमांतर्गत कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, परसबाग व्यवस्थापन, शौचालय/संडास बांधकाम व वापर असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या सर्व कामांवर लक्ष ठेवण्याकरीता ग्रामपंचायत प्रशासनाने गुडमॉर्निंग पथक स्थापन केले आहे.कचरा व्यवस्थापनाअंतर्गत आपले घर व आसपासचा परिसर स्वच्छ राखणे, रस्ते, गल्ल्या, परिसरात सांडपाणी साचू न देणे तसेच कचराकुंड्या व्यवस्थित राखणे इ. कामे करण्यात येणार आहेत. सांडपाणी व्यवस्थापनाअंतर्गत परिसरातील सांडपाणी गटारात सोडणे, सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होतो की नाही हे पाहणे, शोषखड्ड्यांची साफसफाई करणे व जीवजंतूंची उत्पत्ती न होऊ देणे. परसबाग व्यवस्थापनाअंतर्गत घराच्या परिसरात झाडे लावणे, पिण्याच्या पाण्यात टीसीएल पावडर टाकणे व वैयक्तीक स्टँडपोस्ट परिसर स्वच्छ ठेवणे, प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा वापर करणे, अनावश्यक विद्युत वापर टाळणे इ. कामे करण्यात येणार आहेत. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना ग्रामपंचायतीकडून ५०० रू. दंड आकारण्यात येणार आहे तर वैयक्तीक शौचालय बांधण्याकरीता लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीकडून १२ हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. जे ग्रामस्थ शौचालय बांधणार नाही त्यांना १२०० रू. चा दंड आकारण्यात येणार आहे. या व्यतिरीक्त गावकऱ्यांना रेल्वे आरक्षण, मोबाईल रिचार्ज, डाटाकार्ड रिचार्ज, मोबाईल, वीज व विमा हप्ता भरणे इ. सुविधाही ग्रामपंचायत सर्वसाधारण सुविधा केंद्राच्या माध्यमातून देणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना पाटील म्हणाल्या की, ग्राम स्वच्छतेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले असून ग्रामस्थांना विविध सुविधाही दिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)
अर्नाळा गाव होणार स्वच्छ, समृद्ध
By admin | Published: December 02, 2014 11:33 PM