कोरोनाच्या उद्रेकानंतर केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून लाँच केलेले आरोग्यसेतू अॅप गेल्या ८ महिन्यांत अनेकदा वादात सापडले आहे. एक वेळ अशी होती की, या अॅपला वाली कोण हेच केंद्र सरकारला माहिती नव्हते. यामुळे या अॅपवरची विश्वासार्हता कमी झाली होती. आता तर कोरोनाग्रस्तालाच अॅपवर रजिस्टर करून देखील त्याला गेल्या तीन-चार दिवसांपासून 'यु आर सेफ' हिरव्या रंगात दाखवत असल्याने उरलीसुरली विश्वासार्हताही आता कमी होते की काय, असा प्रश्न पडू लागला आहे.
मुळात आरोग्य सेतू हे अॅप कोणी विकसित केले हे ना केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला माहिती नव्हते, ना ही आरोग्य मंत्रालयाला माहिती होते. यावरून केंद्र सरकारचीही मोठी नाचक्की झाली होती. दोन्ही मंत्रालये एकमेकांकडे बोट दाखवत असताना वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर या अॅपचा वाली ठरला होता.
आरोग्य सेतू हे अॅप पास सारखे अनेक ठिकाणी वापरले जात आहे. आरोग्य सेतू मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्यावर आपली माहिती, नंबर रजिस्टर केल्यानंतर तुम्ही कोरोनाबाधित आहात की नाही ते स्टेटसमध्ये दिसते. तसेच हे अॅप आजुबाजुला कोणी कोरोनाबाधित नाही ना याचीही माहिती देत नागरिकांना अलर्ट करते. अनेक ऑफिसेस, विमानतळांवर, मेट्रो स्टेशनमध्ये 'यु आर सेफ'चा स्टेटर पाहूनच एन्ट्री दिली जाते. असे अॅपच जर कोरोनाबाधिताचा स्टेटस तीन-चार दिवस झाले तरीही अपडेट करत नसेल तर आजुबाजुच्यांना तरी कसे समजणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन टेस्ट निगेटीव्ह, तिसरी पॉझिटीव्हमुंबईतील एका मोठ्या फार्मा कंपनीत वरिष्ठ पदावर असलेल्या संदीप (नाव बदललेले) यांना चार दिवसांपूर्वी कोरोना लागण झाल्याचे समजले. घरूनच काम करत असताना त्यांना कॉफी, कापूर याचाही वास ओळखता येत नव्हता. हे लक्षण जाणवू लागल्याने त्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या. यापैकी दोन टेस्ट निगेटिव्ह आल्या. तरीही त्यांनी तिसरी टेस्ट करून पाहिली. ती पॉझिटिव्ह आली. सजग असल्याने संदीप यांनी लगेचच आरोग्य सेतू अॅपवर याची माहिती शेअर केली.
इथूनच खरी थट्टा सुरु झाली. त्यांनी रोज दिवसातून दोन तीन वेळा आरोग्य सेतू अॅपमधील त्यांचा स्टेटस पाहिला. त्यावर 'यु आर सेफ' असेच दिसू लागले. यावर त्यांनी आरोग्य सेतूच्या हेल्पलाईन नंबरवर तक्रार केली. त्यांनी मुंबई महापालिका अपडेट करते, त्यांना कळविण्यात सांगितले. संदीप यांनी मुंबई महापालिकेला विचारले असता ''आमचे ते डोमेन नाही'' म्हणजेच आरोग्य सेतूवर अपडेट करण्याचे आमच्या अधिकारात नाही असे उत्तर आले. यामुळे संदीप यांनी या अॅपच्या विश्वासार्हतेवर आणि केंद्र सरकारने केलेल्या यशस्वीतेच्या गाजावाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मग इतरांना कसे सावध करणार?आता जर कोरोनाबाधितालाच तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा किंवा होम क्वारंटाईन असल्याचा स्टेटस लाल रंगात दिसला नाही तर ते अॅप वापरणाऱ्या अन्य युजरना तरी कसे सावध करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे कोरोना ग्रस्ताच्या संपर्कात येण्याची किंवा विमानतळ, कार्यालयांमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका कैकपटीने वाढणार आहे. याचबरोबर आधीच मालकाच्या शोधात भटकणाऱ्या या आरोग्य सेतू अॅपवर रुग्णाची माहिती अपडेट करण्याची जबाबदारी कोणाची पालिका, जिल्हा परिषदा, राज्य सरकारे की त्या कोरोनाबाधिताची हा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे