लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘आरोग्याची वारी, पंढरपूरच्या दारी’ असे ब्रीद घेत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे २७, २८ आणि २९ जूनला आषाढीनिमित्त जमणाऱ्या लाखो भाविकांसाठी तीन महाआरोग्य शिबिरे होणार आहेत. विभागाचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी बुधवारी पत्र परिषदेत ही माहिती दिली.
१० लाख वारकऱ्यांची शिबिरात आरोग्य तपासणी व उपचार केले जातीलच, शिवाय ते आपापल्या गावी परतल्यानंतरही सरकारी रुग्णालयांमध्ये पुढचे उपचार मोफत करण्यात येणार आहेत. पालखी तळांवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामार्फत मोफत तपासणी, औषधांचे वाटप केले जाईल. वारी मार्गावर दर दोन किलोमीटरमागे एक आरोग्य पथक नेमण्यात आले आहे. अशी १२७ पथके तैनात आहेत. पालखी मार्गावर सर्व १,९२१ हॉटेलमधील कामगारांची आरोग्य तपासणी व पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. १५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहितीही सावंत यांनी दिली. दिव्यांगांसाठी मोफत साहित्य वाटप केले जाईल. डॉ. सावंत यांची संस्था व अन्य एका एनजीओमार्फत तिन्ही दिवस शिबिरात येणाऱ्यांसाठी मोफत चहा, नाश्ता दिला जाईल.
- ९,००० खासगी व सरकारी डॉक्टर व कर्मचारी महाआरोग्य शिबिरात सेवा देतील.
- ५,००,००० वारकऱ्यांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
ही सुविधा कुठे मिळेल?- पंढरपूरपासून सुरक्षित अंतरावर तीन ठिकाणी शिबिरे होतील. त्यात ६५ एकर समोरील मैदान, वाखरी व गोपाळपूरचा समावेश आहे.