इथे निर्माल्यातून तयार होणारा सुगंध दरवळतो घरोघरी; खराब फुलांपासून अगरबत्ती!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 09:40 AM2023-12-11T09:40:28+5:302023-12-11T09:40:54+5:30
दादर बाजारातील खराब फुलांवर प्रक्रिया करून अगरबत्ती.
मुंबई : मंदिरात अथवा घराघरांतील निर्माल्यातून सध्या सुगंध दरवळत आहे. शिवस्नेह सामाजिक प्रतिष्ठानच्या केंद्रात निर्माल्याचे ढीगच्या ढीग येऊन पडतात. कोमेजलेली, काहीशी मलूल झालेली तर काही टवटवीत फुलांचा यात समावेश असतो. या निर्माल्यावर प्रक्रिया करून अगरबत्तीच्या रूपात ही निर्माल्ये घरोघरी, देवघरात दरवळत असून सुगंधाच्या रूपाने निर्माल्य ‘टवटवीत’ होते आहे.
महापरिनिर्वाण दिन सरल्यानंतर असंख्य टन निर्माल्य जमा झाले होते. मुंबई पालिकेने हे निर्माल्य योग्य ठिकाणी पोहोचवले आणि एक सुगंधी प्रवास सुरू झाला. दादरच्या शिवस्नेह सामाजिक प्रतिष्ठानला जमा झालेले निर्माल्य देण्यात आले. फक्त चैत्यभूमीवरीलच नाही, तर दादरच्या फुल बाजारातील खराब झालेल्या, टाकून दिलेल्या फुलांनाही या केंद्रात ‘बहर’ येतो. याच निर्माल्यापासून या ठिकाणी अगरबत्त्या तयार केल्या जातात. यंदा चैत्यभूमीतून दीड टन निर्माल्य आले. हे निर्माल्य किंवा फुले आधी सुकवली जातात. सुकवल्यानंतर त्यांचे वजन कमी होते. साहजिकच निर्माल्य १०० किलो भरले. निर्माल्य विविध प्रकारचे असते. निर्माल्यात प्लास्टिक किंवा दोरे असतात. ते बाजूला काढून फक्त फुले निवडली जातात. या पुलांवर प्रक्रिया केली जाऊन सुगंधी अगरबत्ती तयार केली जाते.
...आणि फुलांची केली जाते पावडर
निवडलेली फुले सुकवल्यानंतर त्या फुलांची पावडर केली जाते. क्रशरमध्ये टाकून ही पावडर केली जाते. पावडर काडीवर घट्ट बसावी, सुटू नये यासाठी विशिष्ट मिश्रण लावले जाते. त्यामुळे पावडर काडीला घट्ट धरून राहते. त्यापूर्वी पावडरीत विविध प्रकारची सुगंधी द्रव्ये टाकली जातात. मोगरा, चंदन त्याशिवाय अन्य सुगंधित द्रव्यांचा वापर केला जातो. त्यातून तयार होतात विविध सुगंधाच्या अगरबत्त्या ! या अगरबत्त्यांचे मग पॅकेजिंग केले जाते. १०० किलो निर्माल्यातून २०० ते २५० अगरबत्त्या तयार होतात.
फुल मार्केटवर भर :
प्रतिष्ठान दादरमध्येच आहे आणि फुल बाजारही दादरमध्येच आहे. त्यामुळे फुले मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. शिवाय अन्य ठिकणाहून निर्माल्य-फुले येतात. पालिका अनेकदा आणून देते, अशी माहिती प्रतिष्ठानचे हितेश पुराविया यांनी दिली. गेले वर्षभरापासून आम्ही निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती करत असून सध्या तरी आम्ही फक्त मुंबईतच वितरण करत आहोत. चांगला होलसेलर उपलब्ध झाल्यास अन्यत्रही वितरण करता येईल, असेही ते म्हणाले.