तब्बल ७० उमेदवार दहावी शिकलेले
By admin | Published: February 8, 2017 04:42 AM2017-02-08T04:42:08+5:302017-02-08T04:42:08+5:30
‘एन’ वॉर्डची महापालिका निवडणूक भाजपाच्या अतिश्रीमंत उमेदवाराबरोबरच निरक्षर व पदव्युत्तर उमेदवारांमुळे चांगलीच चर्चेत राहणार आहे.
दीप्ती देशमुख, मुंबई
‘एन’ वॉर्डची महापालिका निवडणूक भाजपाच्या अतिश्रीमंत उमेदवाराबरोबरच निरक्षर व पदव्युत्तर उमेदवारांमुळे चांगलीच चर्चेत राहणार आहे. घाटकोपर पूर्व व पश्चिम विभागात चार निरक्षर तर १० पदव्युत्तर उमेदवारांचा समावेश आहे. याच वॉर्डमधील ७० उमेदवार जेमतेम दहावीपर्यंत शिकले आहेत. तर दहा पदव्युत्तर व आठ जणांनी व्यावसायिक शिक्षण घेतले आहे. त्यामुळे ‘एन’ वॉर्डचे मतदार निरक्षर की पदव्युत्तर उमेदवाराला निवडणार आहेत, हे पाहणे गमतीचे ठरणार आहे.
अडाण्यांचे राजकारण; सुशिक्षित लोक राजकारणात उतरत नाहीत, असा सामान्यत: समज आहे. मात्र मुंबईसारख्या शहरात हे चित्र बदलत आहे. सुशिक्षितांचाही राजकारणात सहभाग वाढत आहे. याचे उदाहरण म्हणजे महापालिकेचा ‘एन’ वॉर्ड. येथे कमी शिक्षण घेतलेल्यांची संख्या जास्त असली तरी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊन राजकारणात भाग घेणाऱ्यांची संख्याही उल्लेखनीय आहे. भाजपाच्या भारती बावदाने या डॉक्टर आहेत. तर काँग्रेसचे हारुन खान यांचा मुलगा रोशन खान याने पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच भाजपाच्या साक्षी पवार यांचाही त्यात समावेश आहे. त्याशिवाय पदवीपर्यंत शिक्षण घेऊन निवडणुकीच्या रिंगणार उतरणारेही येथे आहेत.
मंगळवारपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपुढे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, ‘एन’ वॉर्डमध्ये अवघे चार उमेदवार असे आहेत की ज्यांनी शाळेचे तोंड पाहिलेले नाहीत. पाचवीपर्यंत शिकलेले १९ उमेदवार, नववीपर्यंत शिकलेले ३६ उमेदवार, दहावीपर्यंत शिकलेले ३४ उमेदवार, बारावी पूर्ण केलेले २५, पदवी घेतलेले २४, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले दहा व व्यावसायिक शिक्षण घेतलेले आठ जण आहेत.
‘एन’ वॉर्डचे मतदार कमी शिक्षण घेतलेल्या की उच्च शिक्षण घेतलेल्या उमदेवाराला पसंदी देतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)