तब्बल ८,४०० क्विंटल भात पडून
By admin | Published: May 26, 2015 10:44 PM2015-05-26T22:44:04+5:302015-05-26T22:44:04+5:30
मार्केटिंग फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्र ी संघाच्या वतीने शासकीय आधारभूत किंमत देऊन भात खरेदी केले जाते.
विजय मांडे ल्ल कर्जत
मार्केटिंग फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्र ी संघाच्या वतीने शासकीय आधारभूत किंमत देऊन भात खरेदी केले जाते. हे भात नंतर शासन उचलते मात्र कर्जतच्या गोडाऊनमध्ये एका वर्षापासून पडून राहिलेला ८,४०० क्विंटल भात शासनाने अद्याप उचललेला नाही.
दहिवली येथील कर्जत तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्र ी संघाच्या कार्यालयाच्या मार्केटिंग फेडेरेशनच्या मार्गदर्शनाखाली भात खरेदी केंद्र सुरु असते. मागील वर्षी संघाच्या हमी भावाने भात खरेदी केली. आज संघाच्या गोदामात ८,४०० क्विंटल भात पडून आहे. खरेदी केलेले भात शासन उचलून घेऊन जाते मात्र आज एक वर्ष झाले आहे तरी शासनाने भात उचलून नेलेला नाही, तो गोदामामध्ये पडून आहे. गोदामात त्याला उंदीर लागले तर संपूर्ण भाताची नासडी होणार हे नक्की.
गोदाम बंद असल्याने सध्या भाताची काय परिस्थिती आहे हे समजू शकले नाही.मोठ्या प्रमाणात येथील शेतकरी शेती करु न भात पिकवतो. हे भात शासन खरेदी करते मात्र त्याचे योग्य नियोजन नसल्याने भात आजपर्यंत गोदामात पडून आहे. या खरेदीचे योग्य नियोजन झाले तर मुबलक तांदूळ उपलब्ध होवू शकतो.
येथील शेतकऱ्याने पिकविलेला भात शासन खरेदी करते मात्र नियोजन नसल्याने तो गोदामात सडतो. पूर्वी रायगडला भाताचे कोठार संबोधले जायचे. हे खरे आहे. मात्र शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीची किंमत मिळत नसल्यामुळे तो शेतीपासून दूर होत आहे. काहीप्रमाणातच शेतकरी शेती करीत आहेत त्यापासून भात शेती होत आहे. तेच भातकेंद्रावर येऊन भात विकत आहेत मात्र शासनाने खरेदी केलेले भात एक- एक वर्ष गोदामात पडून आहे. त्याचे नियोजन नसल्याने ते गोदामातच सडत आहे. शासनाला बाहेरच्या राज्यातून तांदळाची खरेदी करावी लागते. त्याचा परिणाम तांदळाच्या भावावर होतो आणि सर्वसामान्य नागरिकाला तांदूळ चढ्या भावाने खरेदी करावा लागत आहे. तालुक्यातील हे एक गोदाम आहे अशी जिल्ह्यात किती गोदामे असतील त्याची परिस्थिती अशीच असेल. या गोदामात भाताची उंदरांनी वाट लावली असेल. आता पावसाळा सुरु होईल भात पावसाने भिजल्यावर त्याची आणखी खराबी होईल आणि त्यानंतर ते भात फेकून द्यावे लागणार आहे. म्हणजे शासनाने खरेदी केलेल्या भाताची ही नासाडी यावर कोणाचे नियंत्रण आहे का, याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरवर्षी हमी भावाने भात खरेदी करण्यात येते,त्यामुळे आम्हा भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. परंतु या वर्षी गोदाम उपलब्ध नसल्याने हमी भावाने भात खरेदी झाली नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या भाताला कवडीमोल भाव मिळाला, यापुढे भात शेती करावी की नाही असा प्रश्न आहे.
- तानाजी चव्हाण,
शेतकरी, जांबीवली.