Join us

चोहोबाजूंनी मुसळधार, जनजीवन विस्कळीत; जीवितहानी नाही ; २६ जुलैच्या महाप्रलयाची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 2:16 AM

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी रौद्ररूप धारण केले. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली होती.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी रौद्ररूप धारण केले. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली होती. याशिवाय मुंबई, नवी मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली परिसरात पाणी साचले होते. तर बेलापूर, सीबीडी सेक्टर-५मध्ये भूस्खलन झाले. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई व नवी मुंबईकरांना २६ जुलै २००५च्या महाप्रलयाची आठवण करून दिली. पनवेलमधील गाढी नदीबरोबरच रायगड जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने जिल्हा प्रशासनाचे सतर्कतेचा इशारा दिला आहे.मुंबई : पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. दोनशेहून अधिक सखल भागांमध्ये पंपही सुरू करण्यात आले. मात्र, मुसळधार पावसाने महापालिकेचे सर्व दावे फोल ठरवत हे पंप कुचकामी असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे दिवसभर मुंबईची तुंबापुरी झाल्याचे दिसून आले.मुंबईतील सखल भाग प्रत्येक पावसाळ्यात पाण्याखाली जातात. या समस्येतून मुंबईची सुटका करण्यासाठी ब्रिमस्टोवड प्रकल्पांतर्गत पर्जन्य जलवाहिन्यांची ताकद वाढविण्यात आली. त्यामुळे आता पर्जन्य जलवाहिन्या ताशी पन्नास मि.मी. पावसाचे पाणी वाहून नेऊ शकतात. तसेच नाना चौक, ग्रँटरोड, करी रोड, दादर, हिंदमाता, सांताक्रूझ, खार अशा परिसरांत पावसाच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी आठ पंपिंग स्टेशन तयार करण्यात आली. यापैकी सहा सध्या कार्यरत आहेत. मात्र, ऐन संकट समयी काही पंप दगा देत असल्याचे दिसून आले. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप सुरू करण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी या पंपामुळे पाण्याचा निचराच होऊ शकला नाही. अनेक ठिकाणी सुरू असलेले पंप केवळ आवाज करीत असल्याचे दिसून आले. मुंबईचे माजी महापौर बाबूभाई भवानजी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी दादर परिसरामध्ये पावसात अडकलेल्या नागरिकांसाठी वडापाव व पाणी देऊन मदतीचा हात दिला.बैगणवाडी, राणीबाग जंक्शन, वाकोला ब्रीज, निर्मलनगर, दादर टीटी, गौतम नगर, कैलास लस्सी, शिवाजी पार्क, श्रीराम चौक, आर्थर रोड नाका, नेताजी पालकर चौक, कुरणे चौक, पोदार जंक्शन, साकीनाका, चांदिवली, नायगाव क्रॉस रोड, हिंदमाता, शिंदेवाडी, भोईवाडा, रुइया कॉलेज, माटुंगा सर्कल येथे मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले होते.मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत ३१० ठिकाणी पंप बसवण्यात आले. या पंपांपैकी २१० पंप सुरू करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेने दिली.नाना चौक हा परिसर सखल भाग म्हणून ओळखला जातो; परंतु क्लिव्ह लॅण्ड बंदर आणि लव्हग्रोव्ह बंदर पंपिंग स्टेशनमुळे या भागात पाणी तुंबण्याचे प्रकार कमी झाले आहेत. तरीही या भागात पाणी तुंबल्यास या ठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवण्यात आले. या भागात पाणी साचल्यामुळे येथील पंप सुरू करण्यात आले; परंतु हे पंप सुरू असले तरी पाण्याचा निचरा होत नव्हता. या वेळी या पंपामध्ये डिझेल टाकून केवळ आवाज केला जात होता, अशी नाराजी स्थानिक नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.दुपारी ४.४८ मिनिटांनी समुद्रात मोठी भरती होती. या काळात लाटांची उंची ३.२३ मीटर एवढी होती. मोठ्या भरतीच्या काळात समुद्राचे पाणी बाहेर फेकले जात असल्याने पाणी तुंबते.महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचे तीस हजार कामगारांसहित अभियंता, सहायक आयुक्त, उपायुक्त रस्त्यावर होते.वरळी येथे ३०३ मिलीमीटर इतक्या सर्वांत जास्त पावसाची नोंद झाली आहे. वडाळामध्ये २५३, परळ २४०, वरळी २४६, वांद्रे पश्चिम २१०, विलेपार्ले २१२, कुर्ला २१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईत सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सरासरी १८० मि.मी. इतका पाऊस झाला. एका ठिकाणी तर ३०३ मि.मी. इतका उच्चांक पावसाने गाठला आहे. ४ ठिकाणी २७५ ते २९९ मि.मी, ३ ठिकाणी २५० ते २७४ मि.मी, १० ठिकाणी २०० ते २५० मि.मी. १८ ठिकाणी १५० ते २०० मि.मी. आणि ८ ठिकाणी १२५ मि.मी. पावसाची नोंद झाली. १०० मि.मी.पेक्षा कमी पाऊस फक्त ४ ठिकाणी झाला आहे. मंगळवारी सकाळपासून शहर विभागात सरासरी १५६.४६ मि.मी. पूर्व उपनगरांत सरासरी १९७.३७ मि.मी. तर पश्चिम उपनगरांत सरासरी १८२.४३ मि.मी. इतकी पर्जन्यवृष्टी झाली आहे. सर्वात जास्त वरळी येथे ३०३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. महापालिकेचे एकूण ४८ पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित होते.गणेशोत्सव मंडळांची लगबगदोन दिवसांपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाºयांची चांगलीच धावपळ झाली. जोराच्या वाºयामुळे अनेक मंडळांच्या बाह्य देखाव्यांचे नुकसान होऊन, मंडपांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. तर जोराचा पाऊस असल्यामुळे भाविकांनी घराबाहेर निघण्याचे टाळल्यामुळे भक्तांविना मंडळे ओस पडली होती.बेस्टतर्फे सुरक्षेच्या कारणात्सव धारावी, वडाळा, दादर, परळ, नेपीयन्सी रोड येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परेल नाका, डिलाइल रोड येथील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. दरम्यान, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही काही ठिकाणांवरील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणात्सव खंडित करण्यात आला होता, अशी माहिती रिलायन्सच्या वतीने देण्यात आली.मध्यरात्रीपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तर रेल्वे रुळावरही पाणी साचल्याने ट्रान्स हार्बर मार्गावर धिम्या गतीने वाहतूक सुरू होती. तर ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे रेल्वेस्थानकालगतचे भुयारी मार्ग जलमय झाले होते. मागील दोन वर्षांपासून घणसोली, कोपरखैरणे स्थानकांत फलाटावर जाण्याच्या भुयारी मार्गातही तीन ते चार फूट पाणी साचत आहे. यामुळे प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढत जाताना गैरसोयींना सामोरे जावे लागले.

टॅग्स :मुंबईत पावसाचा हाहाकारमुंबई पोलीसमुंबई महानगरपालिकामध्ये रेल्वेरेल्वे प्रवासी