मच्छिमार नौकांवरील खलाशांना आपल्या मायदेशी परतण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 06:13 PM2020-05-02T18:13:01+5:302020-05-02T18:13:24+5:30
मायदेशी परतण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा
मनोहर कुंभेजकर
मुंबई : राज्य सरकारने परराज्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी प्रवास करण्याची नुकतीच अनुमती दिली आहे. त्याप्रमाणे राज्यातील ११००० मच्छिमार नौकांवरील खलाशांना आपल्या मायदेशी परतण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, अशी मागणी आता मच्छिमारांकडून जोर धरु लागली आहे.
केंद्र सरकारने लॉकडाऊन सध्या तरी दि,१७ मे पर्यंत वाढवला आहे.मात्र गेल्या दि,२४ मार्च पासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाला होता.गेल्या वर्षी दि, १ ऑगस्ट ला मासेमारी सुरू झाल्यानंतर आलेली ५-६ चक्रीवादळे,अवकाळी पाऊस यामुळे मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाला सामोरे जावे लागले होते.तर नंतर कोरोनाच्या आजाराने मच्छिमारांच्या व्यवसायाचे कंबरडे मोडले असून त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
राज्यातील ११००० मच्छिमार नौकांवरील परराज्यातील खलाशी लॉकडाऊन नंतर मासेमारी विना बसून आहेत.येत्या दि,१ जून ते दि,३१ जुलै पर्यंत पावसाळ्या निमित्त मासेमारी बंद राहणार असून मासेमारीचा नवा मोसम हा दि,१ ऑगस्टला सुरू होणार.त्यामुळे राज्यातील मच्छिमार नौकांवरील खलाशांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा अशी आग्रही मागणी भारतीय मच्छीमार काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी संतोष कोळी यांनी मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांना एका पत्राद्वारे केली आहे.
मच्छिमारांच्या नौकांवरील खलाशांची माहिती मच्छिमार संस्थांमार्फत गोळा करून त्यांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यास खूप सोयीस्कर होणार असे मत संतोष कोळी यांनी शेवटी व्यक्त केले.