Join us

विस्थापितांसाठी संक्रमण शिबिरांची व्यवस्था करा - काँग्रेस

By admin | Published: August 08, 2015 1:45 AM

ठाणे व कल्याण-डोंबिवली महानगर पालिकांच्या हद्दीतील धोकादायक इमारतींमधील सुमारे दीड लाख विस्थापितांसाठी संक्रमण शिबिरांची व्यवस्था करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी

मुंबई : ठाणे व कल्याण-डोंबिवली महानगर पालिकांच्या हद्दीतील धोकादायक इमारतींमधील सुमारे दीड लाख विस्थापितांसाठी संक्रमण शिबिरांची व्यवस्था करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.आ. संजय दत्त आणि ठाणे शहर व कल्याण-डोंबिवली परिसरातील काँग्रेस पदाधिका-यांचा समावेश असलेल्या सदर शिष्टमंडळाने शुक्रवारी सायंकाळी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शिष्टमंडळातील सदस्यांनी धोकादायक इमारतींसंदर्भात अनेक गंभीर मुद्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले. विखे पाटील यावेळी म्हणाले की, ठाणे जिल्हा प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित महापालिकांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील ५० अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. महापालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार दोन्ही शहरांतील सुमारे २९१ धोकादायक इमारती जमीनदोस्त होणार आहेत. शहरांतील सुमारे ३५० धोकादायक इमारतींमध्ये दीड लाख रहिवासी वास्तव्यास आहेत. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी पालिकेची नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे इमारती पाडल्यानंतर हे रहिवासी रस्त्यावर येण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर सदर नागरिकांसाठी पुरेशी व्यवस्था असलेले संक्रमण शिबिरे उभी करण्याची मागणी त्यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)