चार व्हॅनिटी व्हॅन पोलिसांच्या सेवेला
कोरोनाबाधित पोलिसांसाठी २५० बेड्सची व्यवस्था
चार व्हॅनिटी व्हॅन पोलिसांच्या सेवेला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढाईत मुंबई पोलीस रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा ऑनड्युटी २४ तास कार्यरत आहेत. या काळात पोलिसांच्या उपचारासाठी हेळसांड होऊ नये म्हणून काेराेनाबाधित पाेलिसांसाठी सांताक्रुझ येथील कोळे कल्याण येथील मुख्यालयात २५० बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे. येत्या आठवड्याभरात त्याचे काम पूर्ण होईल.
कोरोना काळात लॉकडाऊन, संचारबंदी आदेशाच्या अंमलबजावणीसह सर्वच जबाबदाऱ्या पोलिसांवर आहेत. यात पोलीस ठाण्यात कार्यरत मनुष्यबळावर सर्वाधिक ताण आहे. या ताणातूनच गेल्या २४ तासांत ३५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील ८ हजार ६५५ अधिकारी, अंमलदार बाधित झाले आहेत. त्यापैकी १०२ जणांचा मृत्यू झाला. कोरोना संसर्ग झालेल्यांपैकी ७ हजार ९५१ पोलिसांनी कोरोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर परतले. सध्या ६०२ पोलीस बाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी पोलिसांच्या सांताक्रुझ येथे असलेल्या कोळे कल्याणच्या इमारतीत कोरोनाबाधित पोलिसांसाठी २५० बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे. येत्या चार ते पाच दिवसांत त्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. तसेच पुढेही पोलिसांपर्यंत आवश्यक ती मदत पोलीस कल्याण निधीतून पुरविण्याच्या सूचनाही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
* मुंबई पोलिसांच्या सेवेला चार व्हॅनिटी व्हॅन
शहरातील व्हॅनिटी व्हॅन मालकांनी त्यांची व्हॅन मुंबई पोलिसांच्या सेवेत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस ठिकठिकाणी नाकांबदी करत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहेत. महामार्गांवरही हीच परिस्थिती आहे. अशातच त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना काही क्षणांची विश्रांती मिळावी यासाठी, सोबतच कपडे बदलणे आणि शौचालयाच्या सुविधेसाठी आतापर्यंत जवळपास चार व्हॅनिटी व्हॅन पोलिसांच्या सेवेत देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दहिसर, दिंडोशी, मालाड आणि घाटकोपर या भागांमध्ये या व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत.
......................