उत्तर प्रादेशिक विभागातील कोरोनाग्रस्त पोलिसाची गुरुनानक रुग्णालयात व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 05:25 PM2020-04-24T17:25:13+5:302020-04-24T17:25:38+5:30
पालिकेच्या कर्मचाऱ्यासह स्वतंत्र व्यवस्था
मुंबई : महानगरात उत्तर प्रादेशिक विभागातही कोरोना बाधित पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्याच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी या परिसरात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. महापालिकेच्या वांद्रे पूर्व येथील गुरुनानक रुग्णालयात त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोविड-19 चा संसर्ग झालेल्या सर्व अधिकारी, अंमलदाराना या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत.
मुंबईसह राज्यात गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन सुरु आहे. या कालावधीत मुंबईत कोरोना बाधित रुग्णाचे प्रमाण सातत्याने वाढत राहिले आहे. त्याच्या अटकावासाठी नाकाबंदी व पोलीस बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदारांनाही त्याचा संसर्ग झाला आहे. कोरोना बाधित पोलिसांची संख्या वाढत असून अनेक पोलीस वसाहत व इमारती सील करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रादेशिक विभागामध्ये त्याची संख्या असताना त्यांना एकाच ठिकाणी उपचाराची व्यवस्था झाल्यास योग्य नियंत्रण ठेवता येईल, या हेतूने या विभागातील सर्वांना वांद्रे (पू) येथील महापालिकेच्या गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची माहिती विभागातील सर्व पोलीस ठाण्याना कळविण्यात आलेली आहे.वरिष्ठ निरीक्षकांनी त्याबाबत अधिकारी व अंमलदाराना माहिती देण्याची सूचना केली आहे. पोलिसांबरोबरच महापालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असल्यास त्यांच्यावरही याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.