मुंबई : कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या लाटेचा सामना करीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आणि खासगी रुग्णालये, कोविड केंद्रे येथे एकूण एक लाख खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आला असल्याने ३० हजार खाटांपैकी २९ हजार ४०० खाटा रिक्त आहेत.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईतील दाटीवाटीची वस्ती आणि गर्दीच्या ठिकाणी प्रतिबंधक उपाययोजना करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. यासाठी सात जम्बो कोविड केंद्रांबरोबरच आणखी चार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार उर्वरित तीन जम्बो कोविड केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी १३ हजार मेट्रिक टन व २६ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा करण्यावर भर देण्यात येत आहे.
बाधित रुग्णांची संख्या पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. गोरेगाव नेस्को फेज १ मध्ये दोन हजार खाटा क्षमता असताना फक्त ४० तर फेज २ मध्ये दीड हजार रुग्णसंख्या क्षमता असताना केवळ दोन रुग्ण आहेत. मुलुंड जम्बो कोविड केंद्रामध्ये केवळ ३२ रुग्ण आहेत. तिसरी लाट आल्यास गरजेनुसार खाटा वाढविण्याची तयारी पालिका प्रशासनाने ठेवली आहे.