लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा कहर आणि महाराष्ट्रात लावण्यात आलेले कडक लॉकडाऊन यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कामगार, मजूर आपापल्या गावी परत जात आहे. या कामगारांच्या मदतीसाठी विश्व हिंदू परिषद संघटनेने पुढाकार घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे पेयजल आणि मोबाइल स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाला आहे. रुग्णांच्या संख्येतही मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. या परिस्थितीत आपापल्या गावी परत जाणाऱ्या कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने कंबर कसली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे परिषदेच्या वीस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून १८ व १९ एप्रिल या काळात तब्बल दहा हजार लिटर पेयजलाच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या प्रचंड प्रवासी संख्या लक्षात घेऊन, विशेषतः महिलांच्या आरोग्याचा विचार करत नऊ मोबाइल स्वच्छतागृहे सुरू करण्यात आली आहेत.
गेल्या वर्षीही प्रवासी मजुरांसाठी रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषद, जनकल्याण समिती, केशवसृष्टी माय ग्रीन सोसायटी, सेवा सहयोग, सेवांकुर, निरामय सेवा संस्था, आरोग्य भारती, समिधा अशा विविध संस्थांनी विविध प्रकारचे साहाय्य केले होते. भोजन पाकिटे, शिधा, काढा अशा वेगवेगळ्या स्वरुपाची मदत करण्यात आली होती. कोरोनाने पुन्हा एकदा, अधिक तीव्रतेने डोके वर काढले आहे. संघ संबंधित संस्था पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आल्या आहेत. प्लाझ्मा डोनेशन सूची, क्वारंटाइन परिवारांना भोजनाची व्यवस्था, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, बेड आदींची सोय अशी विविध स्वरुपाची मदत केली जात आहे.