मनोहर कुंभेजकर, मुंबई: देशात लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या सार्वजनिक गणेश उत्सवात आता मोठया प्रमाणात वाढ होत आहे.त्यातही विशेष करून मुंबई शहरात अनेक समाजाचे लोक यात भाग घेऊन सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्तीची स्थापना करून गणेशोत्सव मोठया स्वरूपात करतात.
मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तीचे विसर्जन विशेष करून गोरेगांव, आरे कॉलॉनी तसेच नॅशनल पार्क व इतर काही ठिकाणी होत असे.मात्र आरे कॉलनी व नॅशनल पार्कच्या तलावात गेल्या काही वर्षात काही हिंदू विरोधी एननजीओंनी चुकीचा अहवाल कोर्टाला सादर करून कोर्टामार्फत गणेश विसर्जनास बंदीचा आदेश प्राप्त करून घेतला.
एनजीओंचा न्यायालयात प्रभाव जास्त प्रमाणात पडून येताना दिसून येत आहे हि अत्यंत चिंतेची बाब आहे.त्यामुळे कृपया शासनामार्फत त्वरित या खटल्यात हस्तक्षेप करून शासन कायदा तसेच न्यायालयाचे आदेशानुसार पूर्वीप्रमाणे गणेश विसर्जन करता येईल अशा प्रकारची व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.
राजकीय दृष्टीने जितके लक्ष द्यावयास हवे होते तितके न दिले गेल्याने एनजीओचे मनोबल वाढले.अनेक गणेश भक्तांच्या भावना दुखावतील आणि ते चिंताग्रस्त होतील अशा प्रकारे त्यांनी गोरेगाव आरे तलावाचा विषय हाती घेऊन पुन्हा न्यायालयात धाव घेतली याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
आपण कृपया शासनामार्फत तातडीने यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे कारण ज्या एन. जी. टी. च्या ऑर्डरचा उल्लेख करून न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्या अहवालात गणेश विसर्जनाच्या बाबतीत असे कोणतेच मुद्दे मांडलेले दिसून येत नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले. योग्य वेळी शासना मार्फत या गोष्टींवरती लक्ष न घातल्यास व गांभीर्याने न घेतल्यास येणाऱ्या काळात एन.जी.ओ. समुद्रात देखील गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यास बंदी घालण्यासाठी प्रयत्न करतील अशी टीका त्यांनी केली.त्यामुळे आपण सर्वांनी गणेश विसर्जनाबाबतीत किंवा कार्यक्रमाचे आयोजनाच्या बाबतीत एकरूप रेषा धोरण ठरवले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
समुद्रात होत असलेल्या गणेश विसर्जनात होणारी वाढ लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने छोट्या छोट्या जागात कृत्रिम तलावाची निर्मिती करून गणेश उत्सव विसर्जनाची चांगली सोय गेले काही वर्षांपासून सुरु केल्याने आणि त्याला नागरिकांचाही खूप चांगला प्रतिसाद दिसून येतो. आपण सर्वांनी मिळून आणि न्यायालयाचे मार्गदर्शन घेऊन भावी काळासाठी ते केलं पाहिजे परंतु इतक्या मोठ्या विषयावरती सखोल चर्चा विनिमय न होता अशा प्रकारचे आदेश पारित होऊन अंमल बजावणी देखील होणे आणि आपण लोकांनी हे शांतपणे स्वीकारणं हे लोकशाहीला घातक आहे. तसेच ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला एक नवीन दिशा देऊन देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलंय आणि ज्या मुंबई शहरात स्वराज्य भूमीची निर्मिती होत असतांना ते शहराला मुळीच परवडणारे नाही असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रात नमूद केले.