कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर देणारा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला संसदेत सादर होईल. पण, कोरोनामुळे रोजगारावर काम करणाऱ्या कामगारांचे मोठे हाल झाले आहेत. त्यामुळे सरकारने अर्थसंकल्पातून कायमस्वरूपी रोजगार मिळेल असे उपाय करावेत, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली.
-----
नाका कामगारांना आज पूर्णवेळ काम मिळत नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सरकारने असंघटित कामगारांना बेरोजगार भत्ता लागू करावा. त्यामुळे कामगारांना दिलासा मिळेल.
- विनोद बनसोडे, कामगार
दोन कोटी नोकऱ्या - दरवर्षी इतके रोजगार देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, मागच्या सहा वर्षांत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी झाली आहे. सरकारने बेरोजगारी संपविण्यासाठी पावले उचलावीत.
- मिथिलेश कुमार, कामगार
आम्ही बाहेरच्या राज्यातून कामासाठी आलो आहोत. इथे घर चालवून कुटुंबीयांना मदत करावी लागते. सरकारने कामगारांच्या वेतनात वाढ करावी. अनेकदा त्यांना काम करताना सुरक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत. त्यासाठी उपाययोजना करावी.
- शिवालक दास, कामगार
केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात रोजगार उपलब्ध करून द्यावा. त्यादृष्टीने प्रकल्प उभारावेत. आम्ही झारखंडवरून कामासाठी मुंबईत आलो आहोत. आमच्या राज्यात आम्हाला वेळेवर काम आणि वेतन मिळाल्यास इतर राज्यांत भटकंती करावी लागणार नाही.
- रणजीत राव, कामगार