मनोहर कुंभेजकर, मुंबई : आरे मधील तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला काही जणांनी बंदी असावी, असे आदेश आणले आहेत. काही लोक गणेशोत्सवात सतत विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र आज मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि उपनगर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपण विनंती केली असून आरे मध्ये कृत्रिम तलाव तयार करुन विसर्जन व्यवस्था करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास डिपीडीसी मधून फंड खर्च करु, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतल्याची माहिती अँड आशिष शेलार यांनी दिली.
मुंबई-मुंबई भाजपातर्फे गणेशोत्सवाचे जोरदार स्वागत करण्यासाठी मुंबई भाजपाची टिम तयार झाली असून याही वर्षी गतवर्षी प्रमाणे याही वर्षी मुंबईचा मोरया ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उत्साहाने सणवार साजरे करणाऱ्या गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने गतवर्षी पासून "मुंबईचा मोरया" या भव्य गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून याहीवर्षी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 6 ट्रेन आणि 338 एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गणेशोत्सव, दहिहंडी उत्सव, नवरात्र उत्सवासह विविध सण उत्साहात जल्लोषात साजरे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, दरवर्षी प्रमाणे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यावेळी मुंबई भाजपा तर्फे 1 तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यातर्फे 1 आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितशे राणे यांच्यातर्फे 2 ( मोदी एक्सप्रेस) अशा 4 रेल्वे गाड्यांचे पुर्ण नियोजन झाले असून अजून 2 गाड्या प्रस्तावीत असून एकूण 6 रेल्वे गाड्यांची सुविधा कोकणवासीयांना करण्यात आली आहे. 15 तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
तर मुंबई भाजपातर्फे कोकणातील चाकरमान्यांसाठी 256 एसटी बसची मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून काही माजी नगरसेवकांनी आपापल्या विभागात खाजगी बसच्या सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अंधेरी येथून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यातर्फे 51 बस सोडण्यात येत असून वांद्रे पश्चिम येथून ही 31 एसटी बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजपाकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अलिबाग अशा कोकणातील सर्व गावा पर्यंत 338 हून अधिक बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
मुंबईत याचवेळी "मुंबईचा मोरया 2023" या भव्य गणेशोत्सव स्पर्धेची लगबग सुरु आहे. गतवर्षी या स्पर्धेला मुंबईकर गणेशोत्सव मंडळांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.गतवर्षी 1200 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सहभाग घेतला होता. यंदा तर 2500 हून अधिक गणेश मंडळे सहभागी होतील अशी अपेक्षा आहे, असा विश्वास ही शेलार यांनी व्यक्त करताना मुंबईतील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे. मुंबई बँकेच्या सहयोगाने संपन्न होणारी "मुंबईचा मोरया 2023" ही स्पर्धा उत्कृष्ट मुर्ती, उत्कृष्ट सजावट/ देखावा आणि उत्कृष्ट परिसर स्वच्छता या तीन गटात होणार असून असून प्रत्येक गटात पहिले बक्षीस 3 लाखांचे असून ही तीन पारितोषिके त्याचप्रमाणे प्रत्येक गटात दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख 50 हजार रुपये तर तृतीयसाठी 75 हजार रुपये बक्षीसे देण्यात येणार आहेत. तर 11 हजाराची 12 उत्तेजनार्थ अशी बक्षीसे तर सहभागी सर्व मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचे विजेते ठरविण्यासाठी एकुण 30 तज्ञ गटांची स्थापना करण्यात येणार असून मुर्तीची सुबकता, सजावट, स्वच्छता आणि सामाजिक संदेश या निकषांवर निष्पक्ष निर्णय घेऊन स्पर्धा समितीकडून विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
भाजपा कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर आणि त्यांची टीम दिवसरात्र याचे नियोजन करीत आहे, तर विधान परिषदेचे गट नेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांचाही या कामी मोठा पुढाकार असून भाजपाचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, विविध मोर्चे आघाडी पदाधिकारी आणि बुथ अध्यक्षां पर्यंतचे पदाधिकारी कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या तयारी एक टीम म्हणून काम करते आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सव गतवर्षी प्रमाणेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त सहभागीता भाजपाची असून भाजपा आणि गणेशोत्सव असे एक नातेच निर्माण झालेले पहायला मिळेल, असा विश्वास आमदार अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
कोकणी माणसासाठी बाकी कोणी काय केलेय का?
मुंबई आमची, कोकण आमचे म्हणायचे आणि घरात कडी लावून बसायचे असा कार्यक्रम सध्या काही जणांचा सुरु आहे. तर काही जण आंदोलन करुन क्रेडिट. घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही शेलार म्हणाले.