लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोलिसांनी मला १७ मे रोजी अटक केल्याचे दाखविले आहे. वास्तविक, त्यांनी १६ मे रोजी राजस्थानमधील उदयपूर येथून अटक केली आणि अहमदाबादमार्गे मुंबईत आणले. त्यामुळे मला केलेली अटक बेकायदेशीर आहे, असा दावा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याने शुक्रवारी उच्च न्यायालयात केला. पोलिसांनी भिंडेचा हा दावा फेटाळत कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच भिंडेला अटक केल्याचे न्या. भारती डांग्रे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाला सांगितले.
भावेशचे वकील रिझवान मर्चंट यांनी न्यायालयाला सांगितले की, मुंबई पोलिसांनी १६ मे रोजी भावेशला हॉटेलमधून ताब्यात घेत उदयपूरवरून अहमदाबादपर्यंत कारने प्रवास केला आणि अहमदाबादवरून मुंबईत विमानाने आणले. पोलिसांनी अटक १७ मे रोजी केल्याचे दाखविले आहे. त्यामुळे १६ मे ते १७ मेपर्यंतची अटक बेकायदा आहे.
मीरा-भाईंदरमधील होर्डिंग्ज हटवा घाटकोपर दुर्घटनेनंतर जाग आलेल्या महापालिकांनी त्यांच्या हद्दीतील बेकायदा होर्डिंग्ज उतरविण्याचे आदेश मालकांना दिले. मीरा-भाईंदर महापालिकेनेही त्यांच्या हद्दीतील १७ बेकायदा होर्डिंग्ज हटविण्याचे आदेश दिले. या आदेशाला होर्डिंग्ज मालकांनी उच्च न्यायालयाला आव्हान दिले. मात्र, न्या. एम. एस. सोनक व न्या. कमल खटा यांच्या खंडपीठाने होर्डिंग्ज हटविण्याचे आदेश दिले.