मुंबई : राज कोरडे अपहरणप्रकरणी आ. प्रकाश सुर्वे यांना अटक करावी, अशी मागणी करत मंगळवारी भूमाता ब्रिगेड अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बोरीवली पोलीस ठाण्याला घेराव घातला. तसेच याबाबत लेखी पत्रदेखील त्यांनी पोलिसांना दिले.आ. प्रकाश सुर्वे हे जैविक वडील असल्याचा खळबळजनक आरोप राज कोरडे यांनी केला होता. त्यानंतर त्याचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे मागाठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करा, या मागणीसाठी देसाई यांनी आंदोनल केले. या प्रकरणी आ. सुर्वे, गणेश नायडू आणि त्यांचे सहभागी यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी त्यांनी पोलिसांना लेखी निवेदनही दिले आहे. सध्या राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणानंतर पोलीस खात्यावरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास उडत चालल्याची खंतही देसाई यांनी व्यक्त केली. यामुळे अशा प्रकारचे गुन्हे दाखल न होता जर ते दाबले जाणार असतील, तर फिर्यादीच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीदेखील देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सुर्वे हे जैविक वडील असल्याचा दावा करत डीएनए तपासणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती राज कोरडे यांनी माध्यमाशी बोलताना दिली.माझे राजकीय खच्चीकरणहा प्रकार म्हणजे माझ्या राजकीय खच्चीकरणाचा प्रयत्न आहे. मुंबईत आंदोलनासाठी पुण्यातील एका महिलेला बोलावून पोलिसांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. या प्रकरणात भाजपा आमदाराचा सहभाग असून, तोच याला पाठबळ देत आहे. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही.- प्रकाश सुर्वे,शिवसेना आमदार, मागाठाणे
प्रकाश सुर्वेंना अटक करा! तृप्ती देसार्इंची मागणी
By पंढरीनाथ कुंभार | Published: November 29, 2017 5:46 AM