"मनोज जरांगेंना अटक करा"; भाजपा आमदाराची विधानपरिषदेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 11:24 AM2024-02-27T11:24:59+5:302024-02-27T11:35:56+5:30
जरांगेंना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात आता राजकीय वातावरणात तापलं असल्याचं दिसून येत आहे. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना गंभीर आरोप केले होते. फडणवीसांचा एकेरी भाषेत उल्लेख करत, मला ठार मारण्याचं कारस्थान होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. जरांगे यांनी फडणवीसांबद्दल जातीवाचक भाषाही वापरली. त्यानंतर, भाजपाआमदार व नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत आज त्याचे पडसाद उमटले. त्यातून, जरांगेंना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजपाआमदार आशिष शेलार यांनी केली. त्यानंतर, विधानपरिषदेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन माजी विरोधी पक्षनेते आणि आमदार प्रविण दरेकरही चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करत, आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर आंदोलनाचे षडयंत्र रचले जात होते, असा गंभीर आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी आमदार रोहित पवार यांचंही नाव घेतलं.
जरांगेंच्या सभेच्या खर्चाबाबतचा प्रश्न उल्लेख दरेकर यांनी दगडफेकीच्या घटनेची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, जर केंद्रीयमंत्री नारायण राणेंना अटक होऊ शकते, केवळ मुख्यमंत्र्यांना चापट मारेल, असं बोलल्यानंतर मंत्री महोदयांना अटक केली होती. मग, मनोज जरांगेंना अटक का होत नाही. मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणीही दरेकर यांनी विधानपरिषदेत केली. दरम्यान, जरांगेंकडून देवेंद्र फडणवीसांबद्दल वाट्टेल ते बोललं जात आहे. जरांगेंना लायसन्स दिलं आहे का, असा सवालही दरेकर यांनी विचारला.
जरांगेंचा सरकारला इशारा
सरकारला शेवटची विनंती, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका. मराठा समाजाचे पुढचे आंदोलन साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात करा. जनता मालक की सरकार बघूया. मराठा समाजातील वकिलांना विनंती आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांच्यासाठी लढा. वकिलांनी मोफत लढावे, न्यायालयातून जामीन करून घ्या. देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत. तुम्ही सगळ्यांनी शांततेत राहा. मी बघतो काय करायचे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दिला आहे.