दहिसरमधील भाजप कार्यकर्त्यावरील हल्ल्याच्या सूत्रधाराला अटक करा, नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 05:48 AM2023-03-21T05:48:26+5:302023-03-21T06:36:02+5:30
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला.
मुंबई : दहिसरमध्ये भाजप कार्यकर्त्यावर ५० जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याचा मुद्दा सोमवारी विधानपरिषदेत चर्चेला आला. यावर या हल्ल्याचा जो कोणी सूत्रधार असेल त्याला उद्या मंगळवारपर्यंत अटक करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले.
हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. कोणाच्या दबावाखाली गुन्हा दाखल करण्यात तसेच रुग्णालयात भरती करण्यात मनाई करण्यात आली, याचीही चौकशी केली जाईल, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या वतीने सांगितले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, एका विधानसभा सदस्याच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या बिभीषण वारे नावाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. तलवारीने वार केले. यात अनेक गुन्हे दाखल असलेला आशीष नायर हा होता. आमदाराच्या मुलाचा चालकही सामील आहे.
हल्ल्यानंतर जखमी वारे यांना पालिकेच्या रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. पोलिसांनीही गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण होत असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे संबंधिताला मोक्का लावा. सरकारने याबाबतीत खुलासा करून निवेदन करावे, अशी मागणी दानवे यांनी केली.
परब यांनीही कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, एक आमदार खुलेआम रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडतो तर दहिसरमध्ये कार्यकर्त्यांना चिथावणी देताना आड येणाऱ्यांचे हातपाय तोडा, तुम्हाला टेबल जामीन मिळवून देतो, असे म्हणतो. अशा बेलगामांना चाप बसला पाहिजे, अशी मागणी परब यांनी केली.
सूडभावनेने केलेला हल्ला - दरेकर
राजकीय सूडभावनेने हा हल्ला करण्यात आला असून अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्याची आवश्यकता आहे. पोलिस निरीक्षक आणि उपअधीक्षकाला त्याचप्रमाणे रुग्णालयात दाखल करून न घेणाऱ्या शताब्दी रुग्णालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यालाही निलंबित करा तसेच हल्लेखोरांना तत्काळ अटक करून मोक्का लावा, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली.