मुंबई : घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून मुंबई आणि आसपासच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या नऊ बांगलादेशींना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या आठवडाभरात पकडले आहे. यात दोन बांगलादेशी महिलांचा समावेश आहे.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, घुसखोर बांगलादेशीची माहिती हाती लागताच एटीएसच्या काळाचाैकी पथकाने गेल्या आठवड्यात सर्च ऑपरेशन सुरू केले. गोपनीय माहितीच्या आधारे नवी मुंबईतील नेरुळ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी दिनसलम शेख ऊर्फ दिनइस्लाम इकबाल शेख आणि साबू शहादत मीर ऊर्फ साबू सुरभ मीर यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नेरुळ पोलिसांच्या ताब्यात दिले. तर दुसऱ्या कारवाईत एका गुन्ह्यातील अजामिनपात्र वाॅरंट बजावलेल्या बांगलादेशी महिला माजरा रसूल खान हिला नेरुळमधून ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
भायखळा परिसरातून सौम्या संतोष नाईक ऊर्फ सुलताना शब्बीर खान ऊर्फ सुलताना संतोष नायर ऊर्फ टिना या बांगलादेशी महिलेसह सलमान अश्रफअली शेख ऊर्फ आलमगीर राजू शेख, सलिम तय्यब अली ब्यापारी ऊर्फ सलीम खलिल मुल्ला आणि वसिम रबीउल मोरोल यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, चिंचपोकळी परिसरातून सुमोन अल्लाउद्दीन शेख आणि नूर इसस्लाम नोशिर शरदर ऊर्फ जिबोन नोशिर मोडल यांना ताब्यात घेऊन ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.