नक्षलग्रस्त भागातून नोकराच्या मुसक्या आवळल्या! लग्नाचा अहेर चोरून झालेला पसार
By गौरी टेंबकर | Published: September 30, 2022 06:06 PM2022-09-30T18:06:53+5:302022-09-30T18:08:52+5:30
जुहू पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालकाच्या लग्नात मिळालेला लाखोंचा अहेर आणि दागिने घेऊन टिपूलाल बबजुई मीना (२७) हा नोकर राजस्थानमधील धारियाव नामक नक्षलग्रस्त भागात लपून बसला होता. मात्र जुहू पोलिसांनी त्याच्या तिथूनही मुसक्या आवळल्या. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
विलेपार्ले पश्चिम येथील जुहू स्कीमच्या एनएस रोड क्रमांक-५ येथील कांचन बिल्डिंगमध्ये प्लास्टिकचे व्यापारी प्रथम मनोज गांधी (२८) राहतात. त्या ठिकाणी मिना हा नोकर म्हणून काम करत होता. गांधी यांचा मार्च महिन्यामध्ये विवाह झाला होता. त्यानुसार त्यात मिळालेली जवळपास ८ लाख रुपयांची रोख रक्कम आणि १ लाख ८५ हजारांचे दागिने त्यांनी घरातील लाकडी कपाटात ठेवले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. तक्रारदार गांधी हे त्यांच्या मरोळ परिसरात असलेल्या कार्यालयात गेले होते. तेव्हा मीना याने गांधी यांच्या घरातील लाकडी कपाट उघडून त्यातील ८ लाख रुपये रोख आणि चांदीचे दागिने घेऊन पळ काढला.
पैसे बँकेत जमा करण्यासाठी २१ सप्टेबर रोजी जेव्हा गांधी यांनी कपाट उघडले तेव्हा चोरी झाल्याची बाब गांधी यांच्या लक्षात आली व त्यांनी तात्काळ जुहू पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारी नंतर कलम ३८१ अंतर्गत जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित वर्तक यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस निरीक्षक अशोक मोरे, उपनिरीक्षक विजय धोरटे आणि पथकाने तपास सुरू केला.
गुप्त माहितीच्या आधारे त्यांना समजले की आरोपी मीना राजस्थानातील धारियाव या नक्षलग्रस्त भागात लपून बसला आहे. तेव्हा पथक त्याठिकाणी दाखल झाले आणि सापळा रचत मीनाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ लाख रुपये रोख आणि चोरीला गेलेले चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.