Maharashtra Election 2024: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सुनील राऊत यांच्या ऐन विधानसभा निवडणुकीत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सुनील राऊतांनी केलेल्या विधाना प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. "सुनील राऊत यांना अटक होणार. आम्ही विक्रोळी पोलीस स्टेशन आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. पोलिसांनी राऊत यांना नोटीस बजावली आहे", अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली.
विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या सुनील राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. याकडे किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे.
सुनील राऊतांना अटक करा, किरीट सोमय्यांची मागणी
विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी आशिष सोनोने यांच्याकडे किरीट सोमय्या यांनी तक्रार केली आहे.
तक्रारीत सोमय्यांनी म्हटले आहे की, "उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार सुनील राऊत यांनी विक्रोळी विधानसभेच्या आपल्या प्रतिस्पर्धी शिवसेना (एकनाथ), महायुतीच्या उमेदवार सुवर्णा सहदेव करंजे यांच्या संबंधात अवमान कारक भाषेत टिप्पणी केली, भाषण केले."
"त्या उमेदवार बकरी आहेत. या बकरीचा बळी २० तारखेला दिला जाणार. बकरीची कुर्बानी हे मुस्लीम/इस्लाम धर्मात बकरी ईदच्या दिवशी दिली जाते. अशा प्रकारचे वक्तव्य केले. सुनील राऊत यांनी बकरीचा बळी म्हणजे या बकरीची कुर्बानी म्हणजेच सुवर्णा करंजे यांची कुर्बानी दिली जाणार असे म्हटले", असे किरीट सोमय्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
"स्त्रियांचा अपमान, आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या संबंधात आचारसंहिता भंग, महिलासंबंधी अशी अश्लील भाषा. निवडणूक प्रचारात मुस्लीम/इस्लाम धर्मियांना खुश करण्यासाठी में बकरी कि कुर्बानी/बलिदान दुँगा असे वक्तव्य सुनील राऊत यांनी केले", असेही सोमय्यांनी म्हटले आहे.
"यासंबंधात पोलिसांनी ताबडतोब सुनील राऊत यांना अटक करावी, तसेच निवडणूक आयोगाने कारवाई करावी", अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.