भाजपा नेते किरीट सोमय्यांचा इशारा; शिंदे-फडणवीस सरकारला दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 03:50 PM2023-03-27T15:50:25+5:302023-03-27T15:51:24+5:30
FIR मध्ये ६४ लोकांचा उल्लेख होता आतापर्यंत कुणालाही अटक नाही. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याला तात्काळ हटवले पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली.
मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस ठाण्याबाहेर हल्ला झाला होता. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले होते. या हल्ल्यातील आरोपींना अद्याप पकडण्यात आले नसल्याने सोमय्यांनी पोलीस खात्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचसोबत ७२ तासांत आरोपींवर कारवाई झाली नाही तर खार पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन करणार असा अल्टिमेटम सोमय्यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला दिला आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या म्हणाले की, २३ एप्रिल २०२२ रोजी माझ्यावर हल्ला झाला होता. माझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. दगडफेक झाली होती. सीआरपीएफच्या कामात अडथळा निर्माण केला होता. तपास अधिकारी बनवाबनवी करत आहेत. ७२ तासांत कारवाई झाली नाही तर मी खार पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलनाला बसणार आहे हे मी शिंदे-फडणवीस सरकारला होत जोडून सांगतोय असा इशारा त्यांनी दिला.
तसेच या प्रकरणात मी हायकोर्टात गेलो होतो. भारत सरकारने यावर पोलिसांना नोटीस दिली होती. परंतु खार पोलीस अधिकारी अजूनही या प्रकरणाला गांभीर्याने घेत नाहीत. FIR मध्ये ६४ लोकांचा उल्लेख होता आतापर्यंत कुणालाही अटक नाही. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याला तात्काळ हटवले पाहिजे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मी गृह सचिवांना भेटून सांगणार आहे. ज्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ७२ तासांत गुंडावर कारवाई झाली नाही तर मी धरणे आंदोलन करणार असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हायकोर्टात सुनावणीवेळी FIR अपडेट करू असं पोलिसांनी म्हटलं. अजामिनपात्र गुन्हा आहे. तरीही ६४ पैकी जेमतेम १३ लोकांवर २ दिवसांपूर्वी कारवाई झाली. सगळे व्हिडिओ लाईव्ह चॅनेल दाखवत होते. दगड मारले, मला जखम झाली. पोलिसांच्या बनवाबनवीचा मी निषेध करतोय. आजपण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटण्याचं आश्वासन दिले होते परंतु ते आले नाहीत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केले.
उद्धव ठाकरेंची नौटंकी
उद्धव ठाकरेंची नौटंकी सुरु आहे. राहुल गांधी सावरकरांना शिव्या देतात आणि दुसरीकडे असे बोलायचे नाही असा इशारा देतात. हिंदुत्व सोडून ठाकरेंनी हिरवा झेंडा हाती घेतला आहे. उद्धव ठाकरेंची २०१९ ची भाषणे ऐका, दोन्ही हात वर करून मोदी, मोदी बोलायचे. कपिल शर्माचा शो बदलून ठाकरेंचा राऊतांचा कॉमेडी शो आलाय असा टोला सोमय्यांनी लगावला.