Join us

ठाण्यातील ‘त्या’ नगरसेवकांची अटक तूर्त टळली

By admin | Published: November 04, 2015 4:35 AM

ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले ठाण्याचे नगरसेवक सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, हणमंत जगदाळे आणि नजीब सुलतान मुल्ला यांची अटक २

मुंबई : ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले ठाण्याचे नगरसेवक सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, हणमंत जगदाळे आणि नजीब सुलतान मुल्ला यांची अटक २ डिसेंबरपर्यंत टळली आहे. उच्च न्यायालयाने मंगळवारी या चौघांनाही अटकेपासून तात्पुरता दिलासा देत १ लाख रुपयांची हमी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे या चौघांनाही नोटीस बजावत न्यायालयाने त्यांना ठाणे महापालिकेत प्रवेश करण्यास मनाई केली. परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब सुलतान मुल्ला व हणमंत जगदाळे तसेच अपक्ष नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात १२ आॅक्टोबर रोजी एफआयआर नोंदवण्यात आला. अटक टाळण्यासाठी हे चारही नगरसेवक भूमिगत झाले आणि अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने या चौघांनीही उच्च न्यायालयाच्या दिवाळी सुटीकालीन न्यायालयात अटकपूर्व जामिनसाठी अर्ज केला. न्या. आर. के. देशपांडे यांच्याकडे या अर्जावरील सुनावणी होती.सूरज परमार यांची काही बांधकामे बेकायदेशीर होती. त्याविरुद्ध अनेक जनहित याचिका या नगरसेवकांनी दाखल केल्या होत्या. तसेच १५० कोटी रुपयांचा आयकरही परमार यांना चुकता करायचा होता, असे नगरसेवकांतर्फे ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी न्यायालयात सांगितले. तसेच या चारही नगरसेवकांना नाहक यामध्ये गोवण्यात आले आहे. परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या चारही नगरसेवकांची नावे खोडलेली आहेत. त्यामुळे या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. गुप्ते यांनी केला.विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी न्या. देशपांडे यांच्यासमोर परमार यांनी स्पायरल बाईडिंगच्या वहीमध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेले लिखाण सादर केले. न्यायालयाने निर्णय घेण्यापूर्वी परमार यांनी लिहिलेली चिठ्ठी वाचावी. आरोपींवरील गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. परमार यांनी चारही नगरसेवकांची नावे चिठ्ठीतून खोडली असली तरीही एफएसएलने केलेल्या चाचणीतून ती याच चार नगरसेवकांची नावे असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे या चारही नगरसेवकांचे फोन लागत नाहीत. ते पोलिसांना तपासकार्यात मदत करण्यासाठी उपलब्ध नाहीत, असे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले.त्यावर न्या. देशपांडे यांनी चौघांना नोटीस बजावत २ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. तोपर्यंत त्यांना अटक करू नये, असा आदेश पोलिसांना दिला. एक लाख रुपयांची हमी देण्याचे व त्याचबरोबर पासपोर्ट आणि मोबाईल पोलिसांकडे जमा करण्याचा आदेशही न्या. देशपांडे यांनी नगरसेवकांना दिला.या चौघांनाही ठाणे महापालिकेत प्रवेश करण्यास बंदी घालावी आणि चौकशीसाठी वर्तकनगर पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती अ‍ॅड. ठाकरे यांनी न्या. देशपांडे यांना केली. आरोपी महापालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. बहुतांश साक्षीदार महापालिकेमध्येच काम करतात. त्यामुळे पदाचा गैरवापर करून हे चौघे साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे, असे अ‍ॅड. ठाकरे यांनी न्या. देशपांडे यांना सांगितले.न्या. देशपांडे यांनी सरकारचे म्हणणे मान्य करत सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांना ठाणे महापालिकेत प्रवेश करण्यास मनाई केली. (प्रतिनिधी)तिघांचे सदस्यत्व रद्दबेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या ३ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे. यामध्ये मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील, शिवसेनेचे राम एगडे आणि राष्ट्रवादीचे मनोहर साळवी यांचा समावेश आहे.