समशेर पठाणविरोधात अटक वॉरंट जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:33 AM2020-03-18T06:33:41+5:302020-03-18T06:34:02+5:30
पठाण यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने त्यांना अटक करून नागपाडा पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आले.
मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात नागपाडा येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे माजी साहाय्यक पोलीस आयुक्त समशेर पठाण यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. पठाण यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने त्यांना अटक करून नागपाडा पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत कार्यवाही सुरू होती.
नागपाडा येथील आंदोलनात सहभागी झाल्याने पठाण यांच्याविरोधात नागपाडा पोलिसांनी १४९ ची नोटीस जारी केली होती. ७ फेब्रुवारीला त्यांना ही नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना १०७ अन्वये नोटीस देण्यात आली होती. मंगळवारी पोलीस त्यांच्या घरी वॉरंट घेऊन गेल्यानंतर पठाण त्यांच्यासोबत पोलीस स्थानकात आले. पठाण यांनी १९९२-९४ दरम्यान नागपाडा पोलीस स्थानकात पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर व १९९७ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे.
कारवाईबाबत समशेर पठाण म्हणाले, नागपाडा पोलिसांची ही कारवाई बेकायदा असून सूडबुद्धीने ती केली जात आहे. माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही. पोलिसांनी कोणतीही कागदपत्रे जोडलेली नाहीत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी नागपाडा आंदोलन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे अशी चुकीची कारवाई केल्याचा आरोप पठाण यांनी केला. पठाण यांच्यावर कारवाई होत असल्याची माहिती मिळताच निषेध करण्यासाठी फय्याज अहमद, विद्या नाईक, जावेद शेख यांच्यासहित अनेक जण पोलीस स्थानकात हजर होते.
आम्ही समशेर पठाण यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यांना ताब्यात घेतलेले नाही किंवा त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या प्रकरणाची सुनावणी ताडदेवच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे सुरू आहे.
- शालिनी शर्मा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नागपाडा पोलीस स्थानक
नागपाड्याचे आंदोलन ऑनलाइन सुरू
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागपाडा येथे २६ जानेवारीपासून सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्ष आंदोलनापेक्षा आता आॅनलाइन आंदोलनावर भर देण्यात येणार आहे.
याबाबत रुबेद अली भोजानी म्हणाले, कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने कोरोना रोखणे गरजेचे आहे. आम्ही सीएए, एनआरसी व एनपीआर विरोधात असलो, तरी कोरोना विरोधात आम्ही राज्य व केंद्र सरकारसोबत आहोत.