ठाणे : कळवा शिवशक्तीनगरमध्ये एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीची एका तरुणाने, जुन्या भांडणाचा राग मनात धरून घरात घुसून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. हत्येनंतर पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव सुरेश महाकाळ (२७) असे आहे. कळवा पूर्व शिवशक्तीनगरमधील गणेश मित्रमंडळाजवळील एका झोपडपट्टीमध्ये मयत मंगेश मधुकर केदार (४५) हा एकटाच राहत होता. त्याच परिसरात त्याच्या परिचयाचा आधीचा मित्र आरोपी सुरेश महाकाळ (२७) हा कुटुंबासह राहतो. काही दिवसांपूर्वी आरोपी सुरेशच्या बहिणीची मयत मंगेश याने छेड काढली होती. याचा राग सुरेशचा मंगेशवर होता. याच रागातून मंगेश ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री दारूच्या नशेत दरवाजा उघडा ठेवून घरी झोपला असता, सुरेशने ही संधी साधून मंगेशच्या डोक्यावर मोठ्या दगडाने प्रहार करून त्याची निर्घृणपणे हत्या करून पलायन केले होते. कळवा पोलिसांनी तातडीने तपास करून २४ तासांत आरोपी सुरेश याला परिसरातून अटक केली.