सहार पोलिसांची कामगिरी
विमानतळाबाहेर प्रवाशांची फसवणूक करणारा जेरबंद
सहार पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आई आजारी आहे. मेडिकल कॉलेजची फी भरायची आहे. फ्लाईट चुकली, बॅग टॅक्सीत राहिली अशी वेगवेगळी कारणे सांगून मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई विमानतळाबाहेर प्रवाशांकडून पैसे उकळून फसवणूक करणाऱ्या ठगाला सहार पोलिसांनी अटक केली. मोडेला व्यंकट दिनेशकुमार (२२) असे अटक त्याचे नाव असून, त्याने अशाच प्रकारे १३ व्यक्तींची १ लाख ६३ हजार रुपयांना फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी रोजी रघुनंदन ठाकरे (२७) हे नागपूर येथे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे थांबले होते. दरम्यान मोडेला व्यंकट दिनेशकुमार (२२) याने त्यांच्याकडे मदत मागितली. यात, ‘मला परीक्षेसाठी चंदीगडला जायचे आहे, माझी फ्लाईट चुकली, आता दुसरे तिकीट काढण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, मला साडेसात हजार गुगल पे करा, नंतर पैसे पाठवतो’, असे सांगितले.
त्यांनीही विश्वास ठेवून गुगल पे केले. त्यानंतर काही दिवसांनी पैशांची मागणी करताच, त्याने फाेनवर अरेरावीची भाषा करत फोन कट केला. त्यानंतर १३ जून रोजी ठाकरे पुन्हा विमानतळावर थांबले असता संबंधित तरुणाच्या संशयास्पद हालचाली त्यांच्या नजरेस पडल्या. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे मदत मागत तरुणाला ताब्यात घेतले. त्यानुसार सहार पोलिसांनी ठाकरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
चौकशीत, मूळचा आंध्र प्रदेशचा रहिवासी असलेेला मोडेला अशाच प्रकारे पैसे उकळत असल्याचे समोर आले. त्याने, मुंबई, दिल्ली, बेंगलोर, चेन्नई विमानतळाबाहेर १३ व्यक्तींची १ लाख ६३ हजार रुपयांना फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली.
..................................