लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बँकेत पैसे मोजत असलेल्या खातेदाराला काही नोटा बनावट आल्याचे सांगत, पैसे मोजून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठगाला मालमत्ता कक्षाने मंगळवारी बेड्या ठोकल्या आहेत.
जे. जे. मार्ग येथे फरीदा इलेक्ट्रिकलवाला या महिलेने बँकेतून दीड लाख रुपये काढले. त्या तेथेच पैसे मोजत असताना ठगाने त्यांच्याकडे काही बनावट नोटा आल्याचे सांगितले. तसेच पैसे मोजून देण्याच्या नावाखाली ५० हजार रुपयांवर हात साफ करत तो पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फरीदा यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला.
दुसरीकडे मालमत्ता कक्षानेही समांतर तपास सुरू केला. यात, सीसीटीव्हीच्या मदतीने पथकाने आरोपीला अंबिवली येथून ताब्यात घेत, जे. जे. मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. जे. जे. मार्ग पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात अटक केली. त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारे फसवणुकीचे ८ गुन्हे नोंद आहेत. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
............................................