मुंबई : प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घरांसमोर बॉम्बस्फोट घडविले जाणार आहेत, असा दूरध्वनी नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला करून खळबळ उडवून देणाऱ्याला गुन्हे शाखेच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटने (सीआययू) शनिवारी पुण्यातील लाेणीकंद येथे अटक केली. राजेश कडके (२०) असे त्याचे नाव असून तो दिव्यांग आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला निनावी फोन आला. फोन करणाऱ्याने तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिलीप जोशी यांच्या जीविताला धोका असल्याचे सांगत अंबानी, अमिताभ आणि धर्मेंद्र यांच्या निवासस्थानांसमोर बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
तसेच या सेलिब्रिटींच्या घराबाहेर शस्त्रे आणि बंदुकांसह २५ जण येणार असल्याचेही सांगितले. नागपूर पोलिसांनी ही बाब तातडीने मुंबई पोलिसांना कळवली. तपासाअंती हा खोटा कॉल असल्याचे समजले.
तांत्रिक तपासातून लागला काॅलचा छडा
- तांत्रिक तपासातून राजेश कडके या दिव्यांग व्यक्तीने हे दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले.
- सीआययूने त्याला पुण्यातील लोणीकंद येथून शनिवारी अटक केली.
- याप्रकरणी अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.