सायबर पोलिसांची कारवाई
सायबर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या काळात नागरिक स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी विमा संरक्षण घेण्याच्या प्रयत्नात आहेत. याचाच फायदा घेत सायबर ठगांकडून नवीन विमा पॉलिसी सुरू करून देण्यासोबतच जुन्या विमा पॉलिसी अपडेट, टॉपअप् आणि नूतनीकरण करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील टोळीचा सायबर पोलिसांच्या मध्य विभागाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे.
दिल्लीतून अदनान खान, सौरभ कन्हैयालाल, प्रसूनकुमार सिन्हा, हर्षित छिक्कारा, पंकज शहा आणि मोहन शहा यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही मंडळी सावजाची माहिती मिळताच त्यांना कॉल करून अन्य माहिती मिळवतात. त्यानंतर त्या व्यक्तीला फोन करून जुन्या विमा पॉलिसीची माहिती घेतात. याच माहितीच्या आधारे पुढे स्वतः विमा पॉलिसीधारक असल्याचे भासवून विमा कंपनीकडून या विमा पॉलिसीची अधिकची माहिती मिळवतात. त्यानंतर पुन्हा त्या टार्गेट केलेल्या व्यक्तीला कॉल करुन ती विमा पॉलिसी अपडेट, टॉपअप् आणि नूतनीकरण करून देण्याच्या बहाण्याने वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्या पैशावर डल्ला मारत होती.
या ठगांनी अशा प्रकारेच एका ७० वर्षीय वृद्धाची ७४ लाख ५५ हजार ६८३ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सायबर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. यात दिल्ली कनेक्शन उघड़कीस येताच पथकाने दिल्लीत धाव घेत आरोपींना अटक केली आहे.