दोन हजारांच्या नोटा देण्याच्या बहाण्याने गंडा, आंतरराज्य टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:56 AM2020-03-03T05:56:01+5:302020-03-03T05:56:05+5:30
दोन हजार रुपयांच्या नोटा अर्ध्या किमतीत देण्याच्या बहाण्याने नागरिकांना लुबाडणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले.
मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटा अर्ध्या किमतीत देण्याच्या बहाण्याने नागरिकांना लुबाडणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. गोरेगाव (पूर्व) येथील हॉटेल वेस्ट इनमध्ये छापा टाकून तिघांना अटक केली. त्यांनी मुंबईसह कोलकाता, बंगळूर,आग्रा, दिल्ली या ठिकाणी अनेकांना गंडा घातल्याची कबुली दिली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे रॅकेट मुंबई उपनगरात कार्यरत होते. त्यांचे आणखी काही साथीदार फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. आनंदकुमार शिवउमेंद्र तिवारी उर्फ अतुल (वय ३० रा.लखनो), सुनील दिनेश्वर यादव (२७,जगन्नाथपुरा) आणि गायत्रीप्रसाद ओमप्रकाश शुक्ला (३२, नवघर रोड, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विमानतळाशेजारील हॉटेल ‘वेस्ट इन’मध्ये शनिवारी भारतीय चलनातील दोन हजार रुपयांच्या नोटा निम्म्या किमतीत देण्याच्या बहाण्याने दक्षिण मुंबईतील एका व्यापाºयाची फसवणूक केल्याची माहिती गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-२च्या पथकाला मिळाली. त्यानुसार, त्याला बोलावून विचारणा केली असता हे प्रकरण उघडकीस आले. त्यानुसार, पथकाने सोमवारी सकाळी त्या हॉटेलवर छापा टाकून तिघांना अटक केली.
>अधिक तपास सुरू
महाराष्टÑ, कर्नाटक, गुजरात, दिल्लीमध्ये अटक आरोपींनी अशा प्रकारे अनेकांना लुबाडले असल्याचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. त्यांच्याकडून मुंबई व परिसरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यांची अधिक चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.