सीबीआयच्या पीएसआयला अहवाल फाेडल्याने अटक; देशमुखांच्या जावयाची वीस मिनिटे चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 08:22 AM2021-09-02T08:22:12+5:302021-09-02T08:22:22+5:30
देशमुखांच्या जावयाची वीस मिनिटे चौकशी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्धचा कथित प्राथमिक चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा उपनिरीक्षक अभिषेक तिवारी याला अटक केली. तर नागपूरचे वकील ॲड. आनंद डागा आणि इतर काही अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याच प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी करून अवघ्या २० मिनिटांत त्यांची सुटका करण्यात आली. त्यांचे वकील ॲड. आनंद डागा यांचा मात्र रात्री उशिरापर्यत जबाब नोंदवला जात होता.
याप्रकरणी अलाहाबाद व दिल्लीत काहींचा शोध घेण्यात येत आहे. शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या या प्रकरणात बेकायदेशीर अहवाल फोडणे व त्यामध्ये फेरफार करण्यात सीबीआयमध्ये कार्यरत असलेला पीएसआय तिवारी मुख्य सूत्रधार होता. तसेच वकील व काही जणांचा यात सहभाग असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
वरळी येथील सुखदा इमारतीतील फ्लॅटमधून बाहेर पडत असताना दहा जणांच्या एका पथकाने चतुर्वेदी यांना ताब्यात घेतले. कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना न देता सीबीआयकडून ही कारवाई झाल्याने देशमुख कुटुंबीयांकडून चतुर्वेदी यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार वरळी पोलीस ठाण्यात देण्यात आली. मात्र वरळी पोलिसांनी अशा प्रकरणात गुन्हा दाखल करता येत नसल्याचे त्यांना समजावले. चतुर्वेदी हे पेशाने डॉक्टर असून, ते जसलोक हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात. साई शिक्षण संस्था हवाला पैसे ट्रान्सफर व प्राथमिक चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.