मुंबई : खुनाची शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेदरम्यान फरार झालेला आरोपी फारुख बागवान (वय ४१) याला गुरुवारी गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-९ च्या पथकाने अटक केली. सहा वर्षांपासून तो ‘अंडरग्राउंड’ होता. मीरा रोड परिसरातून त्याला अटक झाली.बागवानला २००२ मध्ये ओशिवरा पोलिसांनी पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक केली होती. २००८ साली न्यायालयाने त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानुसार त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली. २१ मे २०१२ रोजी बागवान पॅरोलवर बाहेर आला. मात्र सुटीचा कालावधी संपल्यानंतर तो कारागृहात परतलाच नाही. त्याच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला फरार घोषित केले. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी मीरा रोड परिसरात येणार आहे, अशी माहिती क्राइम ब्रांचच्या कक्ष नऊचे प्रमुख महेश देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने मीरा रोड परिसरात सापळा रचून बागवनला अटक केली.
पॅरोल रजेत फरार झालेल्या आरोपीला पुन्हा अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 5:50 AM