आठ वर्षांपासून होता फरार; आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कापड बनविण्यासाठी व्यापाऱ्याकडून कच्चा माल घेऊन १ कोटी २७ लाखांचा गंडा घालणाऱ्या एका मुख्य आरोपीला तब्बल ८ वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. आझम निर्बान (३६, रा. रतनगड, राजस्थान) असे त्याचे नाव असून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला रतनगड येथून अटक केली. त्याचा आणखी एक साथीदार फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
येथील गणेशमल जैन यांची मे. साई इंटरनॅशनल नावाची कंपनी असून त्यांच्याकडून कापड बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरविला जातो. २०१२ मध्ये त्यांनी भिवंडी येथील सदात हाऊस व सुरत येथील मे. जिलानी ग्रे हाऊस येथे ९६ लाखांचा माल पाठविला तसेच साई इम्पेक्स या कंपनीमार्फत ३६ लाखांचे सूत पाठविले होते. १ ते १५ डिसेंबर २०१२ या कालावधीत त्यांनी एकूण १ कोटी २७ लाखांचा माल पाठविला होता.
आझम निर्बान व त्याच्या दोन साथीदारांनी जैन यांच्या वतीने त्यांच्या बिलाची रक्कम परस्पर ग्राहकांकडून वसूल केली व हडप केले. जैन यांना ही बाब समजल्यावर त्यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर तिघे फरार होते. त्यापैकी सदानला २५ मे रोजी भिवंडी येथून अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधार आझम हा रतनगड येथे लपून बसल्याचे समजल्यानंतर सहआयुक्त निकेत कौशिक यांच्या सूचनेनुसार पथकाने तेथे जाऊन त्याला अटक केली. त्याला मुंबईत आणण्यात आले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
..............................