दोघांना सहारमध्ये अटक; मित्राला दगडाने ठेचून मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:14 AM2020-02-19T02:14:03+5:302020-02-19T02:14:06+5:30
मुथ्थु नाडर (३८) आणि अनिल कांबळे (२६) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे
मुंबई : मित्राने एकट्यानेच मटण फस्त केले, या रागात दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी रात्री सहार परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे.
मुथ्थु नाडर (३८) आणि अनिल कांबळे (२६) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अंधेरी कुर्ला परिसरात असलेल्या फूटपाथवर मयत सुनील एम याच्या सोबत ते रहायचे. कचरा वेचून त्यांचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या तिघांनी सोमवारी रात्री काम संपवून मटणाचा बेत केला होता. त्यानुसार त्यांनी मटण आणले आणि रस्त्यावर चूल थाटत ते शिजवले. या तिघांनाही दारूचे व्यसन असल्याने नाडर आणि कांबळे दारू पिण्यासाठी निघून गेले. काही वेळाने ते मटण खाण्यासाठी परतले. मात्र तोपर्यंत सुनीलने ते फस्त केले होते. हे पाहून नाडर व कांबळे त्याच्यावर भडकले आणि त्यांचा हा वाद हाणामारीवर जाऊन पोहोचला. रागाच्या भरात दोघांनी दगडाने सुनीलच्या पोटावर, छातीवर आघात केले आणि त्याला त्याच अवस्थेत सोडून पसार झाले. याप्रकरणी स्थानिकांनी सहार पोलिसांना कळविले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेत सुनीलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तेव्हा त्याची हत्या झाल्याचे उघड झाले. त्यानंतर सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करत नाडर आणि कांबळेला अंधेरीतील मरोळ परिसरातूनच ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान मटणावरून झालेल्या वादात त्यांनी सुनीलला ठार मारल्याचे पोलिसांकडे कबूल केले असल्याचे माने यांनी सांगितले.