Join us

इन्स्टाग्रामवरून ड्रग्ज विकणाऱ्या तरुणीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:07 AM

एनसीबीची कारवाई; एमडीसह दीड लाखांची रोकड जप्तलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोशल मीडियाच्या वापर अमली पदार्थांच्या विक्रीसाठी ...

एनसीबीची कारवाई; एमडीसह दीड लाखांची रोकड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सोशल मीडियाच्या वापर अमली पदार्थांच्या विक्रीसाठी केला जात असल्याचा प्रकार अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) उघडकीस आणला आहे. दक्षिण मुंबईतील डोंगरी येथील एका २१ वर्षाच्या तरुणीला बुधवारी रात्री अटक करून एमडीसह दीड लाखांची रोकड जप्त केली.

ईकरा कुरेशी असे तिचे नाव असून ती इन्स्टाग्रामवर ऑर्डर घेऊन ड्रग्जचा पुरवठा करीत होती. ड्रग्ज तस्कर चिंकू पठाण याच्या टोळीत एक तरुणी आहे. ती एमडी ड्रग्ज, एलएसडी, चरसचा ग्राहकांना मागणीनुसार पुरवठा करीत असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गेल्या महिन्याभरापासून तिचा शोध सुरू होता. मात्र प्रत्येक वेळी ती वेगळी शक्कल लढवित असल्याने तिचा थांगपत्ता लावता येत नव्हता.

तपासात इकरा ड्रग्ज विकण्यासाठी इन्स्टाग्राम या सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे समाेर आले. याद्वारे ती नव्या ग्राहकांशी संपर्क करायची आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करायची. त्याची डिलिव्हरी करण्यासाठी काही महिलांना पाठवित असे. त्यानुसार, बनावट अकाउंट बनवून तिच्याकडे मागणी करण्यात आली. त्याबाबत खात्री झाल्यानंतर बुधवारी तिच्या घरी छापा टाकून तिला अटक करण्यात आली. तिच्याकडे एमडी पावडर व दीड लाख रुपये सापडले. तिच्या अन्य सहकाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.