मालवणीतील कारवाई; डॉक्टर, एमआरसह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला बेेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजारीचे प्रकरण बुधवारी मालवणीत उघडकीस आले. या इंजेक्शनची प्रत्येकी २० हजार रुपये किमतीने विक्री झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणी डाॅक्टर, एमआरसह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मालवणी पोलिसांनी अटक केली. अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए)च्या औषध निरीक्षकांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, एक मेडिकलचे दुकानही संशयाच्या घेऱ्यात आहे.
मालवणीत चढ्या भावाने रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री सुरू असल्याचे मालवणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश पवार यांना १३ एप्रिल रोजी समजले. त्यानुसार त्यांनी परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर व मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहकाला हे इंजेक्शन खरेदीसाठी पाठवत चारकोप नाका परिसरात अन्न व औषध प्रशासनासोबत सापळा रचला. त्या वेळी वसईच्या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणारा सिद्धार्थ यादव (२१) आणि कोविड रुग्णवाहिकेतील डॉक्टर रिजवान आरिफ गलीभ हुसेन मन्सुरी (३२) हे त्या ठिकाणी आले. त्यांनी ग्राहकाकडून ६० हजार रुपये घेऊन त्या बदल्यात त्याला तीन रेमडेसिविर इंजेक्शन दिली.
हा व्यवहार सुरू असतानाच पवार यांच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ अटक केली. चाैकशीत त्यांचा तिसरा साथीदार एमआर चिरंजीवी शिवपूजन विश्वकर्मा (२८) याचे नाव त्यांनी घेतले. त्यानंतर त्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. तो एमआर असून एका नामांकित औषध कंपनीत कार्यरत आहे. तिघेही कांदिवलीचे रहिवासी असून यादव हा डॉक्टर कुटुंबातील आहे. पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार पाटील, पोलीस नाईक बुगडे, पोलीस शिपाई राठोड, शिंदे, वळतकर, नवले या निरीक्षण पथकाने ही कारवाई केली.
* मेडिकलमधील नोंदी आक्षेपार्ह!
विश्वकर्माने तीन इंजेक्शन मालवणीच्या हयात रुग्णालयातील मेडिकलमधून कायदेशीररीत्या विकत घेतल्याचे तपास अधिकाऱ्यांना सांगितले. ड्रग्स इन्स्पेक्टरसह पोलीस मेडिकलमध्ये गेले असता तेथील काही नोंदी आक्षेपार्ह आढळल्याने त्याचा अहवाल औषध निरीक्षक निशिगंधा पष्टे या वरिष्ठांकडे सादर करणार आहेत.
* ...आणि इंजेक्शन्स झाली साठ हजारांची
विश्वकर्मा याने ११ एप्रिल, २०२१ रोजी प्रत्येकी साडे तीन हजार याप्रमाणे हयात मेडिकलमधून तीन इंजेक्शन विकत घेतली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जास्त किमतीत ग्राहक नक्की मिळणार, हे त्याला माहीत हाेते. त्याच दरम्यान बनावट ग्राहकाने रिजवानशी इंजेक्शनसाठी संपर्क साधला. रिझवानने सिद्धार्थकडे या इंजेक्शनची विचारणा केली. तेव्हा सिद्धार्थने विश्वकर्माकडून ३० हजार रुपयांना ही तीन इंजेक्शन विकत घेत ग्राहकाला त्याची किंमत ६० हजार रुपये सांगितली. यापूर्वीही पोलिसांच्या खबरीने त्याच्या नातेवाइकांसाठी हेच इंजेक्शन प्रत्येकी १२ हजार रुपये किमतीला विकत घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
.........................................