टॅक्सी चालकावर चाकू हल्ला करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:16+5:302021-07-07T04:07:16+5:30
गुन्हे शाखेची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : माटुंगा येथे वाटेतच टॅक्सी थांबवून टॅक्सी चालकावर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपी ...
गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माटुंगा येथे वाटेतच टॅक्सी थांबवून टॅक्सी चालकावर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद यासीन मोहम्मद शफी शेख (२३) याला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली होती. शेखला माटुंगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, ते अधिक तपास करीत आहेत.
माटुंगा येथील एका कॉलेजच्या शेजारी २ जुलै रोजी शेखने चालकाला कॉलेजच्या पुढच्या गल्लीत टॅक्सी थांबविण्यास सांगून मोबाईलची मागणी केली. चालकाने मोबाईल देण्यास नकार देताच आरोपीने त्याच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने पळ काढला. चालकाने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधताच गस्तीवरील पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मोहम्मद इरफानच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. प्राथमिक तपासात मोबाईल चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याच्या संशयातून पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीच्या चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे ओळख पटविण्यास अडचण निर्माण होत होती.
माटुंगा पोलिसांबरोबर गुन्हे शाखेच्या कक्ष ४ कडूनही याचा समांतर तपास सुरू होता. सोमवारी पहाटेच्या सुमारास आरोपी बंगालीपुरा वडाळा परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. शेख हा बंगालीपुरा येथील ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणारा आहे.