Join us

सार्वजनिक गणेशाच्या आगमन मिरवणुकांनी दुमदुमली मुंबापुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 6:37 AM

चाकरमान्यांची आवराआवर सुरू : मंडप, मखरांची सजावट अंतिम टप्प्यात

मुंबई : गणेशोत्सवासाठी अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी आवराआवर सुरू केली आहे. अशात सार्वजनिक गणपती मंडपात आणण्यासाठी शेवटचा रविवार मिळत असल्याने २५ रोजी मुंबईतील रस्ते बाप्पाच्या आगमन मिरवणुकांनी दुमदुमून गेले होते.

सकाळी ११ वाजल्यापासून लालबाग-परळ परिसरात शहर-उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची वर्दळ होती. परळ येथील रेल्वेच्या वर्कशॉपपासून ते थेट चिंचपोकळीच्या पुलापर्यंतचा परिसर ढोल, ताशा, बँजोच्या गजरात निनादत होता. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनीही रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. शिवाय, बाप्पाचे विलोभनीय रूप आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी अनेक छायाचित्रकारांनीही मिरवणुकींमध्ये हजेरी लावली होती. आगमन सोहळ्यात कुठे मत्स्यावर उभा असलेला बाप्पा, राजेशाही थाटात सिंहासनाधिष्ठित बाप्पा, कुठे पांडुरंगाच्या अवतारातील बाप्पा तर कुठे पर्यावरणपूरक बाप्पा दिसून आले.

फोर्टचा राजा, अभ्युदयनगरचा राजा, भांडुपचा राजाधिराज, नायगावचा नवसागणपती, काळबादेवीचा गणराज, चेंबूरचा चिंतामणी, कुलाब्याचा लाडका, उपनगरचा राजा, विक्रोळीचा राजा, मालाडचा राजा, सात रस्त्याचा राजा, अंधेरीचा राजा असे जवळपास २२ बाप्पा वाजतगाजत आपल्या मंडपात दाखल झाले.

सोशल मीडियावर अनेक तरुणांनी आतापासूनच ‘आतुरता तुझ्या आगमनाची’, ‘गणपती बाप्पा मोरया’ असे स्टेटस अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेकांचे डीपीही आता बदलू लागले आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर गणेशाच्या आगमनाबद्दलचे नानाविध मेसेज फिरत आहेत. त्यामुळे आतापासूनच गणेशाच्या स्वागतासाठी सारेच गुंतल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीचा अखेरचा रविवार असल्यामुळे लालबाग येथील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.वाहतूककोंडी फोडताना पोलिसांची दमछाकआगमन सोहळे असूनही येथील वाहतुकीच्या मार्गात बदल न केल्याने, बेस्ट आणि टॅक्सींचा लालबाग-परळ परिसरात खोळंबा झालेला दिसून आला. वाहतुकीचे व्यवस्थापन करताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली. शिवाय, रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पोलिसांना मनस्ताप झालेला दिसून आला. बºयाच ठिकाणी २०-२५ मिनिटे बेस्ट बस थांबून असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडालेला दिसून आला.