Join us

श्रींच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील सगळे खड्डे भरा

By admin | Published: August 12, 2016 2:47 AM

पर्यावरण, पाणी, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरणासह अन्य समाजोपयोगी बाबींवर गणेशोत्सवात प्रबोधन करून अधिकाधिक जनजागृती करावी

मुंबई : पर्यावरण, पाणी, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरणासह अन्य समाजोपयोगी बाबींवर गणेशोत्सवात प्रबोधन करून अधिकाधिक जनजागृती करावी, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करतानाच महापौर स्नेहल आंबेकर यांनी प्रशासनाला गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे निर्देश दिले आहेत.अवघ्या मुंबापुरीत गणेशोत्सवाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती कार्यशाळेतून मंडपात वाजतगाजत दाखल होत आहेत. यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणस्नेही व्हावा; या दृष्टीने महापालिका सजग झाली असून, विविध माध्यमांद्वारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवातून प्रबोधन करण्याचे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे.महापालिकेकडून गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करणे, स्पर्धेतील स्पर्धकांची संख्या अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे तसेच उत्तेजनार्थ देण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ करण्यासंदर्भात प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश महापौरांनी दिले आहेत. गणेशाच्या सजावटीकरिता कागदाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा. महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठीचे नियोजन करावे, असे निर्देश देतानाच गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील वृक्षांच्या फांद्या छाटणी करण्याच्या सूचनाही महापौरांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी)