संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘सुलतान’चे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 06:04 AM2019-12-27T06:04:10+5:302019-12-27T06:04:48+5:30

प्रजोत्पादनासाठी वाघ उद्यानात दाखल; नागपुरातल्या प्राणिसंग्रहालयातून आणले मुंबईत

 Arrival of 'Sultan' in Sanjay Gandhi National Park | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘सुलतान’चे आगमन

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘सुलतान’चे आगमन

Next

मुंबई : बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ज्याच्या आगमनाकडे सारे जण डोळे लावून होते त्या सुलतानचे अखेर गुरुवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास उद्यानात मोठ्या थाटात आगमन झाले. व्याघ्रविहारातील प्रजनन साखळी अबाधित राहावी, यासाठी सुलतानला नागपुरातल्या गोरेवाडा येथील प्राणिसंग्रहालयातून मुंबईत आणण्यात आले आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाच वाघ असून त्यात चार वाघिणी आहेत. त्यातील एक वाघ हा उद्यानातच जन्मला होता. त्यामुळे प्रजनन प्रक्रियेमध्ये समस्या निर्माण होत होती. म्हणून बाहेरून वाघ मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांनी महाराष्ट्राच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी सुलतानला आणण्याची परवानगी दिली. सुलतान वाघाने बह्मपुरीमध्ये दोन नागरिकांचा बळी घेतला होता. म्हणून वनविभागाने त्याला ताब्यात घेतले आणि गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवले होते. पर्यटकांना दाखविण्यासाठी सुलतानला आणण्यात आले नसून केवळ प्रजननासाठी त्याला उद्यानात आणले आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वन अधिकारी सचिन रेपाळ यांनी दिली.

सुलतानविषयी अधिक माहिती देताना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे म्हणाले, मुंबई ते नागपूर हा प्रवास साधारण ९०० किलोमीटरचा आहे. २४ डिसेंबर रोजी नागपूर येथून सुलतानला घेऊन निघालो आणि २६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास बोरीवलीमध्ये पथक पोहोचले. प्रवासादरम्यान वाघाची काळजी घेणे आवश्यक असते. त्यानुसार दर १०० किलोमीटरच्या अंतरावर थांबून
त्याला पाणी पाजणे तसेच थोडा आराम करू देणे इत्यादी गोष्टी प्राधान्याने पाहिल्या गेल्या. रस्त्यावरील खड्डे पाहता वाहन सावकाश चालवावे लागत होते. प्रवासादरम्यान त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात होती. प्रवासावेळी जिथे जिथे वनविभागाचे गेस्ट हाउस आहेत तिथे थांबून थोडा वेळ आराम केला जात असे. त्यानंतरच सर्व आढावा घेऊन पुढे प्रवास सुरू केला जात होता. बोरीवलीला सुलतानला आणण्यासाठी गेलेल्या पथकामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी शैलेश पेठे, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांच्यासह वैभव पाटील, संदीप गायकवाड, राजेंद्र भोईर, नंदू पवार, भागडे आदींचा समावेश होता.

वाघांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न
सुलतान गेल्या दीड वर्षापासून गोरेवाडा येथील प्राणिसंग्रहालयात होता. त्याचे वय साधारण चार ते पाच वर्षे आहे. आपल्याकडे सुलतानला आणण्यासाठी गेल्या एक वर्षापासून पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू होता. नोव्हेंबरमध्ये केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने परवानगी दिली. मग उद्यानातील आठ जणांचे पथक सुलतानला आणण्यासाठी नागपूरकडे रवाना झाले. भविष्यात प्रजनन करून वाघांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न असून त्यासाठीच सुलतानला उद्यानात आणण्याचा मुख्य उद्देश आहे.
- विजय बारब्दे, वनपरिक्षेत्र अधिकारी (अधीक्षक), सिंह व व्याघ्र विहार

राज्यातील एकमेव वन्यजीव रुग्णवाहिका : राज्यातील एकमेव वन्यजीवांच्या रुग्णवाहिकेतून ९०० किमीचा प्रवास करीत सुलतानला उद्यानात आणले. या रुग्णवाहिकेत एक हायड्रॉलिक पिंजरा आहे. औषधांचा साठा होता. छोटेखानी आॅपरेशन थिएटर आहे. रुग्णवाहिकेवर सायरनसह अद्ययावत विद्युत व्यवस्था, ध्वनिक्षेपक आहे.

Web Title:  Arrival of 'Sultan' in Sanjay Gandhi National Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.