मुंबई बंदरात तीन मोठ्या जहाजांचे आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:45 AM2020-06-15T04:45:43+5:302020-06-15T04:45:56+5:30
४८२७ नाविकांना घरी पाठवण्याची प्रक्रिया सुरू
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील विविध देशांतील नाविक भारतात मायदेशी मोठ्या संख्येने परतत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून या नाविकांना घरी परतण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. रॉयल कँरेबियनच्या अॅथम आॅफ द सीज, सेलिब्रेटी इन्फिनिटी व कार्निव्हल स्पेल्डर या विविध तीन जहाजांचे मुंबई बंदरात आगमन झाले असून या जहाजातील ४८२७ नाविकांना घरी पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. या नाविकांची कोविड १९ ची तपासणी जहाजावर वैद्यकीय पथक पाठवून करण्यात येत असून नाविकांचा तपासणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येत आहे.
सेलिब्रेटी इन्फिनिटी मधून ९०७ नाविक मुंबईत आले. या सर्वांना साईन आॅफ करण्यात आले असून त्यांना आपापल्या घरी पाठवण्यात आले आहे. अँथम आॅफ सीज मधून तीन हजार भारतीय नाविक मुंबईत परत आले आहेत. कार्निव्हल स्पेल्डंरमधून ९२० नाविक मुंबईत परतले आहेत. अशा प्रकारे एकूण तीन जहाजांतून ४८२७ नाविक मुंबईत परतले, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ ट्रॅफिक मॅनेजर व क्रुझ विभागाचे नोडल आॅफिसर गौतम डे यांनी दिली.