विमानतळावर दोन तास आधी प्रवेश करा, हातमोजे, मास्क, सँनिटाझरचा वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:40 PM2020-04-11T17:40:05+5:302020-04-11T17:40:32+5:30
सीआयएसएफची हवाई वाहतूक मंत्रालयाला शिफारस
मुंबई : देशांतर्गत हवाई प्रवास सुरु झाल्यानंतर देखील हवाई वाहतूकीमध्ये प्रवाशांना उड्डाणाच्या किमान दोन तास अगोदर यावे, प्रवाशांनी मास्क व हातमोजे वापरावेत व विमानतळावर अनेक ठिकाणी हॅंड सँनिटायझरचा वापर केला जावा अशा विविध शिफारशी देशातील विमानतळांची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) ने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला केल्या आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी व पुढील काळात हा आजार अधिक पसरु नये यासाठी या शिफारसी करण्यात आल्या आहेत अशी माहिती सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.
देशात सध्या पंचवीस मार्च पासून चौदा एप्रिल पर्यंत लॉकडाऊनच्या कालावधीत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी लादण्यात आली आहे. ही बंदी उठवण्यात आल्यानंतर जेव्हा विमान वाहतूक सुरु होईल त्यावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही उपाययोजना आखावी अशी शिफारस करण्यात आली आहे. विमानतळावर प्रत्येक एन्ट्री व एक्झिट पॉइंटवर सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांसाठी सँनिटायझर ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. जेव्हा विमान वाहतूक सुरु होईल तेव्हा प्रत्येक दोन प्रवाशांच्या मध्ये एका प्रवाशाचे आसन रिक्त ठेवण्याच्या पर्यायावर विचार व्हावा असे सीआयएसएफने सुचवले आहे. लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर हवाई प्रवास सुरु झाल्यावर विमानतळावर अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यादृष्ट्रीने याकडे पाहिले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विमानतळावरील ऑपरेशन्ससाठी नवीन प्रक्रिया राबवण्याचा सीआयएसएफचा विचार आहे. सर्व विमान कंपन्यांनी त्यांच्या प्रवाशांकडून ते पूर्वी होम कॉरंन्टाइनमध्ये होते की नाही याची माहिती घ्यावी असे सीआयएसएफने सुचवले आहे. जर एखादा प्रवासी कोरोनामुळे होम कॉरंन्टाइन झालेला असल्यास त्याची सुरक्षा तपासणी सीआयएसएफ विशेष आयसोलेशन कक्षात करेल व ती तपासणी करताना सीआयएसएफचे जवान पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) सुट मध्ये असतील, असा प्रस्ताव आहे. विमानातील प्रत्येक प्रवाशांला सँनिटायझर दिले जावे, असे सुचवण्यात आले आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशातील हवाई वाहतूक सुरु करण्याबाबतचा निर्णय १४ एप्रिल नंतर घेतला जाईल असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. देशातील हवाई वाहतूक कशाप्रकारे सुरु करावी व काय काळजी घ्यावी याबाबत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) व एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) संयुक्तरित्या प्रयत्न करत आहेत.